दडपशाहीच्या निषेधार्थ ६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा देशभर चक्का जाम

अकोले प्रतिनिधी, दि. 2 : सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कृषी कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळात देशभर रास्ता रोको करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माकप किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी केले आहे.

दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहेत. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते स्थानिक व्यापारी असल्याचे भासवत आंदोलकांवर पोलिसांच्या मदतीने दगडफेक करत आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे.

आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. असे टीकास्त्र सोडत शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत.असा सनसनाटी आरोपही करण्यात नवले यांनी केला आहे.


आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे. संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेकडून सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार केला गेला आहे. 

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी किसान सभेच्या सर्व शाखा सक्रियपणे नियोजन करत आहेत. समविचारी संघटनांना सोबत घेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी व श्रमिकांना या आंदोलनात सक्रिय भागीदारी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

 502 

Total Visits: 125047

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *