वेशांतर केलेला बाळ बोठे पोलीसांच्या ताब्यात

बोठेला मदत करणाऱ्यांची पोलीसाकडून धरपकड सुरु

अहमदनगर प्रतिनिधी दि. १३ : यशस्वी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खुन प्रकरणाचा मुख सुत्रधार व पत्रकार बाळ ज. बोठे याला हैद्राबाद येथील एका हॉटेलमधुन पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर बोठे याला मदत करणाऱ्यांची पोलीसांनी धरपकड सुरु केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

याबाबत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून अधिक माहीती देताना म्हणाले की, पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटामध्ये 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाली होती. या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोठे हा गेल्या ९० दिवसापासून फरार होता.

त्याला पकडण्यासाठी संपूर्ण राज्यातील पोलीसांचे विविध पथके तयार करुन चारी दिशा पिंजून काढत होते. मात्र तो सापडत नव्हता, अखेर बोठे याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला, त्यावरुन बाळ बोठे हैद्राबाद येथे असल्याचे उघड झाले.

गेल्या पाच दिवसापासून हैद्राबाद व महाराष्ट्रातील ६ पोलीस पथके बोठे याचा शोध घेत होती. तिन वेळा बाळ बोठे याने पोलीसांना गुंगारा देवुन पळुन जाण्यात यशस्वी झाला. अखेर शनिवारी १३ मार्च २०२१ रोजी सकाळी ६ वाजता हैद्राबाद येथील एका हॉटेलातील खोली नंबर १०९ मध्ये लपुन बसल्याचे पोलीसांना समजले पोलीस तिथे गेले मात्र खोलीला बाहेरून कुलुप होते.

पोलीसांना बोठे तिथेच असल्याची खात्री आल्याने त्यांनी खोलीचे कुलुप तोडुन प्रवेश केला असता बाळ बोठे दिसुन आला. नेहमी सुटाबुटात पाहीलेला बाळ बोठे पोलीसांना वेशांतरात दिसला. दाढीमिशा वाढलेल्या, अतिशय साधे कपडे असा आवतारात बोठे पोलीसांच्या ताब्यात सापडला.

दरम्यान बाळ बोठे याला हैद्राबाद येथील बिलालनगर येथे राहणारा त्याचा वकिल मित्र जनार्दन चंद्राप्पा अकुले यांने फरार होण्यास मदत केली. जनार्दन अकुले व बोठे यांची हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापिठात एकत्र असताना ओळख झाली होती. हा मित्र हैद्राबादच्या गुन्हेगारी वस्ती असलेल्या परिसरात राहत होता.

विषेशतः अनेक गुन्हेगारांना लपण्याचे ठिकाण म्हणून बिलालनगर कुप्रसिद्ध आहे. त्याचा अधार बोठेला मिळाला असल्याने संबधीत वकिल मित्रासह नगरमधील महेश वसंतराव तनपुरे याने बोठे याला मदत केल्याच्या कारणावरुन त्याला अटक केली आहे, अशी माहीती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, बाळ बोठे याला या प्रकरणात मदत करणाऱ्यासह खुन करणारा असे सर्व मिळुन १० जनांना ताब्यात घेतले आहेत. आणखी कोणी कोणी मदत केली आहे का? याचा शोध सुरू असुन लवकरच त्यांनाही पकडण्यात येईल असे सांगितले.

 दरम्यान हैद्राबाद येथून बाळ बोठे याला आज सायंकाळ पर्यंत अहमदनगर येथे आणले जाणार आहे त्यानंतर पारनेर न्यायालयात हजर केले जाईल. अशी माहीती पोलीस अधिक्षक पाटील यांनी दिली आहे.

 1,102 

Total Visits: 125090

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *