पालीकेच्या अर्धवट चौथ्या साठवण तलावावर सर्वांचे मौन

कोपरगाव प्रतिनिधी दि. ६ : नगरपालीकेच्या चौथ्या साठवण तलावाचे काम अर्धवट अवस्थेत गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. जे तलाव सर्वात मोठ्या समतेचे व विस्तारीत आहे. पालीकेच्या ३ तलावांची मिळून जितकी क्षमता आहे त्या पेक्षा दुप्पट साठवण क्षमतेचा चौथा तलाव आहे. इतक्या मोठ्या तलावाचे अर्धवट काम पुर्ण केले तर पालीकेची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते पण त्या तलावाच्या अर्धवट अवस्थेवर कोणीच काही बोलत नाहीत.

तलावाचे काम न केल्याने आलेल्या निधी पैकी दिडकोटी निधी शासनाला परत करावा लागला. इतके सर्व नुकसान झाले तरी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पालीकेचे आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व संबधीत अधिकारी मुग गिळुन गप्प का बसले आहेत. हे काम पुन्हा सुरू झाले पाहीजे म्हणून आजपर्यंत कोणीच अंदोलन केले नाही.

उलट कामात भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करावी, अन्यथा काम बंद करा म्हणाऱ्यांची संख्या अधिक होती. कोणी न्यायालयात गेले, कोणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.  या सर्वांच्या मागणी प्रमाणे चौथ्या तलावाचे काम बंद झाले. चौकशीत तलावाचे काम आडकले. अनेक वर्षापासून फक्त चौकशी सुरु आहे. भ्रष्टाचार झाला म्हणून संबधीत ठेकेदारावर कारवाई झाली नाही किंवा चुकीची तक्रार झाली म्हणून संबधीताना समज दिले नाही.

दोघांच्या वादात पाणी साठा काही वाढला नाही. नागरीकांना दररोज पाणी मिळाले नाही. वादाच्या भोवऱ्यात तलाव व जनता आडकली. आता पुन्हा नवीन पाचव्या तलावाची सुरूवात झाली पण चौथ्या तलावा बद्दल सर्वांनी मौन का बाळगले. ज्यांनी काम बंद पाडले त्यांनी पुन्हा काम सुरु करा म्हणून कुठे अंदोलन केले नाही? इतरांनी त्याबद्दल आवाज उठवला नाही. मग पालीकेचा पाणी साठा कसा वाढणार आणि कधी पाणी दररोज मिळणार हा मुख्य प्रश्न उभा आहे. 

ज्या ठेकेदाराला या तलावाचे काम दिले त्याने उप ठेकेदाराला काम दिले. तोही कोपरगावचा नागरीक, ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करुन काम बंद केले तेही इथलेच नागरीक, या दोघांना पाण्याची आंतरमनातून तळमळ आहे असे दाखवतात. तालुक्याच्या दोन्ही नेत्यांना पाणी प्रश्न सोडवायचा आहे असे ते नेहमीच म्हणतात. विद्यमान नगराध्यक्ष पाणी प्रश्न सोडवणार म्हणून विराजमान झाले. आता त्यांचा कार्यकाळ संपत आला तरीही चौथे तलाव अर्धवट आहे.

चौथ्या तलावाचे काम बाजुला ठेवून आता पाचव्या तलावाचे काम सुरू झाले नागरीकांनी या कामाचे अभिनंदन केले. मात्र पाचव्याही तलावाचे काम सध्या निधी अभावी बंद पडले आहे. आमदार आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे हे १०५ कोटीचा निधी मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. निधी आल्यानंतर काम सुरू होईल पण चौथ्या तलावाचे काय?

कोपरगाव शहरातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करण्याची वेळ आली आहे. कधीच वेळेवर शाश्वत पाणी मिळत नाही. कधी धरणात पाणी नसते तर कधी कोपरगाव नगरपालीकेच्या साठवण तलावात नसते. कधी दोन्हीकडे पाणी असले तर वितरण व्यवस्थेची आडचन सांगुन नागरीकांना पाण्यावाचून वंचित ठेवले जाते. कोपरगावच्या पाण्यावरून अनेक अंदोलने झाली मोर्चे निघाले, पालीकेची तोडफोड झाली पण पाणी काही दररोज स्वच्छ येत नाही.

पालीका प्रशासनाने साठवण क्षमता वाढविण्यासाठी नविन चौथ्या तलावाची निर्मीती केली. त्या तलावाची खोली वाढवून पाणी साठा वाढविण्याचा प्रयत्न केला, खोली करणाच्या कामासाठी ३ कोटी रुपये निधी शासनाने दिला. संबधीत ठेकेदाराने वाढीव खोलीकरणाच्या कामाला सुरुवात केली आणि माहीतीच्या अधिकारात संबधीत ठेकेदाराने माती उचलण्याच्या व टाकण्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजीक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला. कोर्ट कचेरीच्या नादात १८ एक्कर जागेतील तलाव अर्धवट राहीले. 

कोपरगावमध्ये एखादे काम जनहीताचे असले की तिथे गटातटाच्या भिंती उभ्या राहतात. आणि त्या नाही तर माहीती अधिकारातुन आडकाठी ठरलेली आहे. नागरीकांच्या तोंडातले पाणी पळवण्याचे काम कोणी ना कोणी करीत आहे. एकाच कामाला दहावर्षे लागतात हे कोपरगावचे दुर्दैव आहे. चौथ्या तलावा बाबत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, संबधीत अधिकारी, नेते कार्यकर्ते आणि सामाजीक कार्यकर्ते, जलतज्ञ काहीच बोलत नसल्याने नागरीकामध्ये वेगळी चर्चा आहे.

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी सर्वांनी जनहीताच्या कामात एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षीत आहे, ही भावना जनमाणसातून व्यक्त केली जात आहे. चौथ्या तलावाचे काम बंद पाडण्यासाठी जसा आक्रमकपणा दाखवला तसा ते चालु करण्यासाठी दाखवला तर पिण्याचे पाणी अधिक मिळेल अन्यथा कमी पाण्यावर जगणाऱ्या लोकांचे गाव म्हणजे कोपरगाव ही नवी ओळख होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 151 

Total Visits: 125114

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *