करोनाच्या भितीने जगावे, कि मरावे हेच कळेना – अंकुश वाघ

कोपरगाव प्रतिनिधी दि. ८ : करोना संसर्गजन्य आजाराचा धसका नागरीकांनी घेतला. त्याची लागण होवू नये म्हणून तब्बल वर्षभर दबकत वावरतोय. लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत झाले. व्यवसायातुन फायदा होण्याऐवजी कर्जबाजारीने जीव मेटाकुटीला आला.

व्यवसाय वाढीसाठी घेतलेल्या कर्जाचे हाप्त गेल्या वर्षभर पासुन थकीत, लाईट बिल अव्वाच्या सव्वा थकीत, दुकानाचे भाडे पट्टी थकलेली आणि व्यवसायाची तर ग्राहकाविना पुरती वाट लागली. त्यात करोनाची लागण होवून लाखो रुपये उपचाराला घालुन पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊनच्या फेऱ्यात व्यवसायीक आडकल्याने हा करोना नावाचा राक्षस माणसाला चारी बाजुने संपवत आहे.

आता जगण्याची आशा कोणाकडे बघून ठेवावी. बाहेर गेले तर पोलीसांचा दंड नाहीतर दांडा, घरात बसले तर खायाचा वांदा. मार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तुंचे दर गगणाला भिडलेले. खरेदी करण्यासाठी जवळ पैशाची कमतरता हि दैनिय अवस्था करोना व लॉकडाऊनच्या कारणाने झाली आहे अशी खंत कोपरगाव व्यापारी संघर्ष समीतीचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी ऊका निवेदनाद्वारे केली आहे.

ते पुढे म्हणाले की, करोना ही न संपणारी प्रक्रिया वाटू लागली आहे, आज करोना मुक्त झालेले रुग्ण पुन्हा बाधीत आढळतात. करोनाचा हा संसर्ग गेल्या वर्षभरापासून थांबता थांबेना, मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का? आतरराष्टीय आरोग्य संघटनेने सुध्दा  स्पष्ट केले आहे. यापुढे करोना बरोबर जगावे लागणार आहे. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत. त्यांची अर्थव्यवस्था कोसळली आहे. छोट्या व्यवसायीकांनी जगायचे कसे?       

आता लॉकडाऊन करण्याआगोदर छोट्या व्यवसायीकासह सामान्य नागरीकांची जगण्याची सोय शासनाने आगोदर करावी मगच  लॉकडाऊन करावे. चार दोन टक्के लोक लॉकडाऊन पाहिजेच असे म्हणणारे आहेत, ते सरकारी कर्मचारी आहेत. सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असतो. हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार? घरात बसून जे पगार घेतात त्यांना कशाला पगार पाहिजे? त्यांना काम नको म्हणून तर ते लॉकडाऊनची मागणी करतात.

त्यांचा पगार बंद करा मग कसे रस्त्यावर उतरतात बघा. आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करत नाही तर आमचे काम सुरू करण्याची मागणी करतोय. हा  देश केवळ  घरात बसून खाणाऱ्यांवर अवलंबून नसतो तर कष्टकरी, श्रमिक यांच्यावर अवलंबून असतो.   वर्षभर करोनाने मारले आता लॉकडाऊन करून मारु नका. सरकार म्हणजे मायबापासारखे असते मग पोटच्या मुलांना कोणी उपाशी ठेवते का? करोनाच्या भितीने फक्त लॉकडाऊन करून नेमकं कोणाला काय सिद्ध करायचे आहे. सर्वसामान्य माणूस कसा जगतो हे त्यालाच माहीती. उपाशी असणाऱ्यांचा अधिक विचार करावा.

जे तुपाशी आहेत त्यांचा विचार करू नका पण जे उपाशी आहेत त्यांचा जरूर विचार करा. काही दिवसांनी कोरोना हा सामान्य आजार म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अनेक कुटुंबे उध्वस्त होवू नये. नियम कितीही कठोर असू द्या लोकं त्याचे पालन करतील, पण लॉकडाऊन मुळीच नको! प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, ज्यांना नाही तो त्याचे प्रायश्चित्त भोगणार आहे. ज्याला त्रास होईल, तो स्वतः दवाखान्यात जाईल, पण ज्याला करोना नाही झाला त्याला किमान उपसमारीने मारू नका. 

आजही भारतात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ती कमावता आहे आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून आहेत, विचार करा त्या एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर ते कुटुंब कसे जगणार, असाच लॉकडाऊन राहिला तर  उपसमारीमुळे भुकबळींची संख्या वाढेल. ते मायबाप सरकार  आपण महाराष्ट्राचे जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख आहात खूप बारकाईने विचार करावा.  नागरीक आपल्याला  सहकार्य करतील पण पुढे अशीच परिस्थिती राहिली तर नागरीकांची सहनशीलता संपेल.

पोटाची खळगी भरण्यासाठी नागरीक रस्त्यावर उतरतील, करोनाला घाबरणार नाहीत. घरात उपाशी राहुन मरण्यापेक्षा करोनाने मेलेले बरे अशी मानसिकता होईल. तेव्हा सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात बदल करावा अशी मागणी अंकुश वाघ यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

 239 

Total Visits: 124978

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *