शेवगाव नगर अर्बनच्या सोनेतारण घोटाळ्याची सखोल चौकशी करा – वंचितचा इशारा 

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ :  नगर अर्बन बँकेच्या शेवगांव शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणाची सखोल चौकशी  होऊन दोषी व्यक्तीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी १२ एप्रिल पासून वंचित बहुजन नगर अर्बन आघाडी आणि फसवणुक झालेले ग्राहक  शेवगांवच्या कार्यलयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा वंचित आघाडीने दिला आहे.

या बाबत  बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी पिडित ग्राहकांची बैठक घेवून हा निर्णय घेतला  असून याबाबतचे निवेदन नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या  प्रशासकांना  देण्यात आले आहे.  निवेदनात म्हंटले आहे की, नगर अर्बन बँकेने   शेवगाव शाखेतील सोने तारण कर्जदार व थकबाकीदारांची यादी नावसाहित प्रसिद्ध केली असून कर्जाची रक्कम व्याजासह १४ एप्रिल पर्यंत भरावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे.

वास्तविक या थकीत कर्जदारांनीच सोने तारण कर्ज प्रकारणाबद्दल बँकेच्या कार्यालयाशी संपर्क साधून शेवगाव शाखेतील तत्कालीन गोल्ड व्हॅल्यूअर कडून आपली फसवणूक झाली असल्याचे वारंवार लेखी स्वरूपात कळविले आहे. परंतु  बँक प्रशासनाने या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. किंवा चौकशी देखील केली नाही उलट कुठलीही चौकशी न करताच संबंधित नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे हे थकीत कर्जदार हवालदिल झाले असून त्यातील एका व्यक्तीने मागील महिन्यात आत्महत्या केल्याने या प्रकरणाला गंभीर स्वरूप आले आहे.

या सर्व कथित थकबाकीदारांची फसवणूक करणाऱ्या शेवगाव शाखेतील अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्यूअर यांचे एक रॅकेट आहे.  या कर्जदार थकबाकीदारांना विश्वासात घेऊन या रॅकेटने पद्धतशीरपणे त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या थकीत सोने तारण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. बँकेच्या नियमानुसार एका व्यक्तीला किती सोने तारण पावत्या करता येतात, परस्पर नूतनीकरण करता येते काय ? सगळ्या सोने तारणच्या वस्तु एक सारख्याच कशा ?  असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.

बँक प्रशासनाने चौकशी न करताच सरसकट कारवाई केल्यास थकीत कर्जदारांना व ज्यांची सोने तारण प्रकरणात फसवणूक झाली आहे, अशा सर्व थकबाकीदारांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करूनच पुढील कारवाई करण्यात यावी, अन्यथा सोमवार दि. १२ एप्रिल पासून करोना प्रतिबंधक सर्व नियम व अटी पाळून थकीत कर्जदारासह वंचितचे कार्यकर्ते बँकेच्या शेवगाव कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपोषणास बसणार आहेत. याची गंभीरपणे नोंद घ्यावी अशी मागणी नगर अर्बन बँक प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक व शाखा व्यवस्थापक यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, तालुका संघटक शेख सलीम जिलानी तसेच फसवणूक झालेले थकबाकीदार सचिन महाजन, अशोक लोढे, गणेश भोंडे, बालाजी महाजन, अनिल निकम, संतोष झिंजे, शेषराव नवले, मच्छीन्द्र निकम, कृष्णा महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

 114 

Total Visits: 125018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *