कोरोना प्रतिबंधक लस व औषधाचा मुबलक पुरवठा व्हावा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी दि. ८ : कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व बाधित रुग्णांना आवश्यक औषधे तातडीने उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त औषधांचा साठा कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी  उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे कि, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे औषधांची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे औषध साठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक औषधे मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबरच उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे इतरही साथींचे आजार वाढले आहेत. कोरोना बाधित रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर सारख्या औषधांचा देखील काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. औषधांचा साठा कमी असल्यामुळे काही ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तसेच औषधांचा साठा कमी असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषध घेण्याची आर्थिक परिस्थिती नसतांना देखील मिळेल त्या किंमतीत औषधांची खरेदी करावी लागू शकते. औषध वेळेत मिळाले नाही तर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल होण्याची वेळ येऊ शकते.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून  कोपरगाव मतदार संघात देखील प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लस देखील कमी प्रमाणात मिळत असून त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत आहे.

एकूण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासठी मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही व बाधित रुग्णांना योग्य किंमतीमध्ये औषध वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी कोपरगाव मतदार संघासाठी जास्तीत जास्त औषधांचा पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेस तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

 97 

Total Visits: 125019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *