शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी विकास नवाळे झाले रुजू

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून सचीन राऊत यांची फेब्रुवारीमध्ये बदली झाल्याने रिक्त झालेल्या मुख्याधिकारी पदी विकास नवाळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी गुरुवारी (दि.७) आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला आहे.

नगरपरिषदेचे विभाग प्रमुखांनी मुख्याधिकारी नवाळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारताच मुख्याधिकारी नवाळे यांनी पालिका आधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येकाची त्याच्या कामकाजाची ओळख करून घेतली. तसेच नगरपरिषदेच्यावतीने सुरू असलेल्या विकास कामाची माहिती घेतली. शहरातील विकास आराखड्या संदर्भात चर्चा केली.

शेवगावात विविध प्रलंबित प्रश्न आहेत, नवीन प्रशस्त इमारत उभारणी करणे, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करणे. तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेला गती देणे, स्वच्छते बाबत जनजागृती करणे व शहर स्वच्छ ठेवणे, दुरावस्थेत असलेल्या स्वच्छता गृहांची दुरुस्ती करणे बाल उद्यान उभारणे, शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करणे,

वाढलेले अतिक्रमण काढणे, नगरपरिषदेचे मालकीचे ओपन प्लेस व गाळे पालिकेच्या ताब्यात घेणे, नगरपरिषदेतील गैर कारभाराला लगाम घालणे अशी विविध आव्हाने नगरपरिषदे समोर आहेत. या आव्हानाना ते कशा पध्दतीने सामोरे जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.