मुख्याधिकाऱ्यांच्या समक्ष म्हैसवर्गीय मटन विक्रेत्यांची बैठक
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : शहरात एकाच ठिकाणी वारंवार गोवंश जनावरांची बेसुमार कत्तल होत होती. जुजबी कारवाई करुन जैसे थे चालणाऱ्या गोवंश जनावरांच्या कत्तलीवर लोकसंवादने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर दहा दिवसानंतर मुख्याधिकारी सुहास जगताप, स्वच्छता विभागाच्या अभियंता रुपाली भालेराव, स्वच्छता निरीक्षक सुनील आरण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील १४ म्हैस वर्गीय जनावरांचे मांस विक्रेते यांची मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या दालनात दुपारी बैठक झाली.
यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी उपस्थित मांस विक्रेत्यांना खडे बोल सुनावले. मांस विक्रेत्यांनी विक्री करण्याची परवानगी मागितली असता मुख्याधिकारी सुहास जगताप म्हणाले की, या पुढे कोणतेही मांस बेकायदेशीर विक्री केल्यास त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून रितसर कारवाई करणार आहे.
बैठकीला उपस्थित असलेल्या १४ विक्रेत्यांनी फक्त म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल पालीकेच्या कत्तलखान्यात रितसर पावती दाखवून करायची आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या पावतीची खातरजमा केल्याशिवाय कत्तल करु देणार नाही. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कत्तल करण्यासाठी दोन पावत्या द्यावयाचे आहे. एक संबधीत विक्रेत्यांकडे व एक नगरपालीकेकडे द्यावे त्यामुळे यापुढे पावत्यांच्या घोळ होणार नाही.
कत्तल केलेल्या मांसाची विक्री कोण करतो त्याच्या नावाची पाटी संबंधीत मांस विक्री करत असलेल्या दुकानात लावावी लागणार आहे. तसेच त्या भागातील मुकादम यांनी पालीकेच्यावतीन पावती व मांस विक्री करणारा यांची खातरजमा करुन पालीकेला दररोजचा अहवाल पाठविण्याचे आदेश काढले आहेत. जर कोणी बेकायदेशीर कोणत्याही जनावरांची कत्तल केल्याचे आढळले तर जिथे कत्तल केली ती इमारत व संबंधीत जागेवर जेसीबी चालवून उध्वस्त करण्यात येईल असा इशारा देत बेकायदा कत्तलीवर मुख्याधिकारी सुहास जगताप व स्वच्छता विभागाचे अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत असा इशारा दिला.
दरम्यान लोकसंवादने यावर लक्ष वेधले होते. शहरात बेकायदा कत्तलखाने बंद करण्याची मुख्य जबाबदारी पालीका प्रशासनाची आहे. त्यांना आवश्यकता वाटली तर स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घ्यायचे असते हे लोकसंवादने दाखवून दिल्यानंतर पालीकेची यंञणा आता अधिक सतर्क झाली आहे.
पालीकेने संबंधीत भागातील स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, त्यांचा मुकादम व इतर कर्मचाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचा आदेश दिल्याने संपूर्ण पालीका आता खडबडून जागी होत. शहरातील संजयनगर, आयशा काॅलनी, हाजी मंगल कार्यालय परिसर व इतर ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी खास माणसांची नियुक्ती करण्ऱ्याची व्यवस्था केल्याने बेकायदा गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता जर गोवंश जनावरांची हत्या केल्याचे उघड झाले तर कत्तल करणाऱ्या बरोबर स्थानिक प्रशासकीय यंञणेतील प्रमुखांना जबाबदार धरले जाण्याची तजवीज केली आहे.