नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्या – स्नेहलताताई कोल्हे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी राहत्या घरांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रवंदे परिसरातील सहाचारी येथे घरावर बाभळीचे झाड पडून दत्तात्रय संजय मोरे (वय २९ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच तहसीलदार विजय बोरूडे यांना फोन करून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ताबडतोब आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी दिल्या.
कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या सहाचारी येथे दत्तात्रय संजय मोरे (वय २९ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह राहत होते. शुक्रवारी (२८ एप्रिल) सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे दत्तात्रय मोरे यांच्या घरावर बाभळीचे झाड पडले. या झाडाखाली दबल्याने दत्तात्रय मोरे यांचा मृत्यू झाला. मोरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी असा परिवार आहे. दत्तात्रय मोरे हे मोरे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी तातडीने सहाचारी येथे जाऊन मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरूडे यांच्याशी मोबाईल फोनवरून संपर्क साधून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ताबडतोब आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. काल शुक्रवारी (२८ एप्रिल) सायंकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. रवंदे, धामोरी, मंजूर आदी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवला होता. कालच्या अवकाळी पावसाने या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष बागांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. याआधीही कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी आणखीनच संकटात सापडले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत दिलेली आहे. आताही सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत आणि नुकसान झालेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना त्वरित अर्थसाह्य देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.