शेवगाव प्रतिनिधी, दि . ९ : सन २० २२ – २३ च्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे अंतिम पेमेंट ३०० रुपये प्रति टन प्रमाणे संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी साखर उपायुक्त अहमदनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने उसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली. वजनात घट होऊन एकरी वीस ते पंचवीस टन उत्पादन आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. उसाच्या टंचाईमुळे अनेक कारखान्यांना आपला गळीत हंगाम लवकरच आटोपता घ्यावा लागला, तसेच यावर्षी साखरेला चांगला दरही मिळत आहे, इथेनॉल ,बग्यास, वीज निर्मिती, यामधूनही साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारा मोठा खर्च लक्षात घेता ज्याप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने २७२५ रुपये अंतिम भाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, त्याप्रमाणे शेवगाव तालुका व परिसरातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने तीनशे रुपये प्रमाणे अंतीम पेमेंट संबंधिताच्या बँक खात्यात जमा करावेत, जो कारखाना याबाबत सकारात्मक निर्णय घेईल त्या कारखान्याला परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस द्यावा असे आवाहन फुंदे यांनी केले आहे.