कोपरगाव प्रतिनिधी, दि.०३ : रामलल्ला अयोध्यानगरीत २२ जानेवारी रोजी न भुतो न भविष्यती असा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. त्याचे प्रसारण भारत देशासह जगातील १६३ देशात करण्याचे नियोजन सुरू असतांना अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपुरचे प्रख्यात चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी ३ ते २२ जानेवारी दरम्यान दररोज संपूर्ण चित्ररूप रामायण मालिकेतील सात चित्रे समाजमाध्यमांवर प्रसारीत होत असल्याने जिल्हयात चर्चेचा विषय ठरला आहे.
चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी कोरोना लॉकडाउन पासुन एक वर्ष आधी याची तयारी सुरू केली होती. त्यांनी मर्यादा पुरूषोत्तम भगवान रामचंद्र यांची संपुर्ण चित्ररूप रामायण मालिका १७५ चित्रातुन रंगविली आहे. त्यासाठी त्यांनी बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्कींधाकांड, सुंदरकांड, युध्दकांड, उत्तराकांड या कथारूप पुस्तकांचा संदर्भ घेतला आहे. ही सर्व १७५ चित्रे रंगविण्यांसाठी त्यांना दीड वर्षे मेहनत घ्यावी लागली.
भरतकुमार उदावंत यांना समाजप्रबोधनात्मक चित्रांची मोठी आवड आहे. ते आवांतर उपक्रमासह चित्रकलेत विशेष रस घेवुन काम करीत आहेत. या अगोदर व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, कोरोनाप्रबोधनाची, विविध उत्सव काळातील प्रसंगांवर प्रबोधन त्यांची चित्रे विशेष गाजली. त्यांना या कामात त्यांचे चिरंजीव सत्यजीत उदावंत हे देखील मदत करतात. सध्या त्यांचे ज्ञानेश्वर मंदिर नेवासा येथील अंतर्गत मुर्ती सजावटीसह प्रसंगानुरूप चित्रे रेखाटन्याचे मोठे काम सुरू आहे.
संपुर्ण चित्ररूप रामायण मालिकेतील चित्रांचे त्यांनी श्रीसंत ज्ञानेश्वर आर्ट गॅलरी गाडेनगर नेवासाफाटा येथे प्रदर्शन भरविले असुन ज्या भाविकांना ही चित्रे पहावयाची असतील त्यांनी ज्ञानेश्वर आर्ट गॅलरीला भेट द्यावी असे आवाहन देखील भरतकुमार उदावंत यांनी आवाहन केले आहे. तीर्थक्षेत्र कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांचेही छायाचित्रे भरतकुमार उदावंत यांनी आकर्षक रंगवली आहेत.