मराठा आरक्षणाचा मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ :  राज्यसरकारने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात केलेल्या विविध मागण्या मान्य करून त्या मागण्याचे अध्यादेश काढले असून मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याच्या बातमीचे शेवगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्ते व समाज बांधवांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

जरांगे पाटलांनी यावेळी घेतलेल्या ‘आर या पार’ च्या भूमिकेला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या प्रतिसादाबद्दल सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार यांना धन्यवाद दिलेत.

येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढून संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यास, क्रान्ती चौकातील पावन गणपतीस तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

या चौकात गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचे शांततेत स्वागत करण्यात आले. तालुक्यात देखील गावोगावी हे वृत्त समजताच तेथेही जल्लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला आहेत.