टेम्पो आजूनही पोलिस ठाण्यात कारवाई न करताच उभा

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ :  तालुक्यातील मुंगी येथील वंचित बहुजन आघाडीच्या काही सतर्क कार्यकर्त्याच्या समय सुचकतेमुळे पोलिसानी चार दिवसापूर्वी आखेगाव रस्त्यावर ताब्यात घेतलेला तो रेशनचा तांदूळ चढ्या भावाने विक्रीसाठी जाणारा टेम्पो आजही पोलिस ठाण्याच्या प्रांगणात कारवाई वीना उभा असल्याने त्याचे गुढ वाढले आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी (दि.३) मुंगीच्या वंचित बहुजन आघाडीच्या कांही कार्यकर्त्यानी वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांना रेशनच्या  तांदळाच्या गोण्याचा एक टेम्पो तेथून शेवगाव कडे निघाल्याची खात्रीशीर माहिती देऊन कार्यकर्ते त्या देम्पोच्या मागावर असल्याची माहिती दिली. तेव्हा शेख यांनी शेवगाव पोलिसांना माहिती दिल्यावरून पोलिसांनी आखेगाव रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाजवळ तो तांदळाचा एमएच १६ ए वाय १४१२ क्रमांकाचा टेम्पो पकडून  पोलिस ठाण्यात आणून लावला आहे.

या घटनेला चार दिवस होऊनही तो टेम्पो कारवाई वीना उभा आहे. पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र दिल्याचे सांगण्यात आले. याबाबत तक्रार कोणी द्यायची हे अद्याप नक्की झाले नसल्याचीही चर्चा आहे.

शासन अनेक लाभार्थीना पूर्णपणे मोफत तर काहींना नाममात्र दरात मोठ्या प्रमाणात रेशनधान्य वाटप करते. यातील अनेक लाभार्थी हे धान्य घेतल्या नंतर त्याची लगेच विक्री करतात असे आढळते. हा तांदूळ असाच लाभार्थ्याकडून घेतलेला आहे काय ? याची पडताळणी होणे अपेक्षित आहे. तसेच पोलिसाना टेम्पो चालकाकडून हा माल कोणी दिला. कोठे द्यायचा हे तर समजलेच असेल. हा माल तसा असेल तर चार दिवसात अद्याप संबंधित कोणी पुढे का आला नाही हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे.