शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : तालुक्यातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलींचे त्याच गावातील एका तरुणाने अपहरण केले होते. दरम्यान त्या मुलींच्या शोधार्थ शेवगाव व स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करुन रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित युवकास सुपा (ता. पारनेर) येथून ताब्यात घेत त्या मुलींची सुटका केली आहे.
तब्बल नऊ दिवस स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी विविध ठिकाणी जाऊन आरोपीचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला, याच दरम्यान वेगवेगळ्या दोन तीनशे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. शेवगाव शहरातील तसेच अहमदनगरकडे जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
दरम्यान, पोलीस पथके आरोपीची माहिती काढत असताना रविवार दि.२८ रोजी, सुपा परिसरातील एका महिलेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फोन वरुन तीन मुली व एक मुलगा सुपा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली. त्यानुसार दिनेश आहेर यांनी तात्काळ पथकास मिळालेली माहिती कळविली. त्यानुसार पथकाने सुपा परिसरामध्ये जावुन शोध घेत त्या तीन अल्पवयीन मुली व त्या मुलास ताब्यात घेतले आहे.
पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय २०) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत, विजय धनेधर, महिला पोलीस अंमलदार छाया माळी यांच्या पथकाने केली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या मुली व आरोपी यास पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहे.