उत्कर्षा रुपवते यांच्या विजय संकल्प सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : निवडणुकीपुरतं असलेले भाजपचं कमळाचं फुल म्हणजे जनतेला एप्रिल फुल करणारे आहे. काॅंग्रेसचा पंजा केवळ निवडणुकीपुरता दिसतो नंतर जनतेला टाटा बाय बाय करतात. सध्या टाईम काहीही असला तरी घड्याळाची वेळ वाईट चालु आहे. तुतारी वाजते की नाही मशाल जळते की नाही कळत नाही फक्त ठेंबा आहे पण कुकरमुळे प्रेमाने आपली दाळ भात तरी शिजते. असे म्हणते सुजात आंबेडकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
कोपरगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या विजय संकल्प सभेच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजाता आंबेडकर बोलत होते. यावेळी वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते, वंचितच्या राज्य उपाध्यक्ष वंचित दिशा शेख, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, शरद खरात वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सुरेश शेळके, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, उत्तर महाराष्ट्र सचिव वामन गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिल बनसोडे, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारेच आज भाजप बरोबर आहेत. भाजपला खरी टक्कर देणारी वंचित बहुजन आघाडी आहे. आमची लढाई ही विचारांची, समतेची, स्वाभिमानाची व सन्मानाची आहे. आजपर्यंत दलित आदीवाशी समाजाला वंचित ठेवण्याचे काम राजकीय प्रस्थापितांनी केले. यापुर्वी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली त्याला महात्मा गांधींनी विरोध केला. स्वतंत्र निवडणुक लढता येणार नाही म्हणून तुषार गांधींनी विरोध केला आता हक्काचे मतदान करुन नये म्हणुन पुन्हा एखादा गांधी दलित आदीवाशींना विरोध करण्यासाठी येईल त्यामुळे घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकारातुन आपला हक्क दाखवायचा आहे. विरोधी डरपोक झाले म्हणुन रूपवते वर दगड मारला पण जनतेने मतदानातून त्यांना उत्तर द्यावे असे म्हणत उत्कर्षा रुपवतेंना विजयी करण्याचा संकल्प आंबेडकर यांनी व्यक्त केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा म्हणाल्या की, शिर्डी लोकसभा मतदार संघातील विरोधी उमेदवारांचे प्रेशर वाढले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एका महीलेने प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांच्या पायाखालची वाळु घसरली आहे. मला सर्वसामान्य जनतेतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद विरोधकांना पचनी पडत नसल्याने माझ्यावर दगड फेक केली, माञ मी सावित्री, जिजाऊ, रमाईची लेक आहे अशा दगडाला घाबरत नाही. माझ्यावर दगड मारणाऱ्यांच्या दगडामागे ज्यांचा हात आहे त्यांच्या मेंदूवर दगड पडला असेल म्हणून दगड मारतात पण हा दगड उत्कर्षा रुपवतेवर मारला नसुन समाजासाठी लढणाऱ्या संपूर्ण स्ञियांवर मारला आहे.
विरोधी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यात मग्न आहेत पण मतदारसंघातील समस्यावर बोलत नाहीत. मला जनतेतुन मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना प्रचारासाठी पुन्हा पुन्हा यावं लागतंय. ज्या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले जाते त्या जिल्हृयातील तिच्याच तालुक्यात दगडफेक केली जाते यावर खुद्द गृहमंञी असलेले देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह जिल्ह्यातील एकाही नेत्याने निषेध व्यक्त करीत एक शब्द बोलु शकत नाहीत. इतर वेळी महीला सक्षमीकरण, सबलीकरण यावर छातीठोकपणे बोलणारे आता शांत का? याचा अर्थ आपले नेते किती असंवेदनशील झाले आहेत असे म्हणत रूपवते यांनी विरोधकांसह जिल्ह्यातील नेत्यांवर निशाना साधला.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या सभेला नागरीकांची गर्दी होती. केवळ गर्दीच नाही तर उत्कर्षा रूपवते यांना विजयी करणारे दर्दी जनता एकवटली होती. उपस्थित अनेक सामान्य नागरीकांनी रुपवते यांना अर्थीक मदत करुन निवडणुकीत बळ देत असल्याचे दिसुन आले.