संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ : प्रत्येक स्पर्धेतुन विद्यार्थी घडत असतात. पहिल्या स्पर्धेतील अपयश हे पुढच्या स्पर्धेतील विजयाची नांदी असते. मात्र जय पराजयापेक्षा स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे असते. यातुनच व्यक्ती भविष्यातील बहुकार्य भुमिका (मल्टी टास्कींग रोल) साकारण्यास सक्षम होतो, व उत्तम करीअर घडते, असे प्रतिपादन कोपरगांव विधानसभेच्या प्रथम महिला आमदार व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये वेगवेगळ्या परीक्षेत मिळविलेले नैपुण्य, देश व राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले यशाबध्दल त्यांचा कोल्हे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या. यावेळी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, स्टुडन्टस् कौन्सिलचे डीन डॉ.मकरंद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर काही पालकही उपस्थित होते. प्रारंभी डॉ. ठाकुर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनीच्या सर्वच संस्था कशा प्रगतीकडे जात आहे, याची थोडक्यात माहिती दिली.
कोल्हे पुढे म्हणाल्या की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी विविध शैक्षणिक दालने खुली केल्यामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांची मुल-मुली शिकू शकली. त्यातील काही मोठे उद्योगपती झाले तर काही देश परदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. स्व. कोल्हे यांना ग्रामीण भागातील मुल-मुली शिकून स्वावलंबी व्हावित, अशी तळमळ असायची आणि आपल्या सर्वच संस्था दर्जेदार असाव्यात, असा ध्यास असायचा. तिच परंपरा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी पुढे चालु ठेवली आहे.
त्या म्हणाल्या की, प्रगती करीत असताना संकटे येतात, परंतु संकटांना आव्हाने समजुन त्यावर मात करावी. जे लोक यशस्वी झाले त्यांना सर्वच परीस्थिती अनुकुल नव्हती. मात्र जिध्द, चिकाटी आणि प्रचंड महत्वकांक्षा असली तर जीवन यशस्वी होते. पुर्वी मुलींना शिकण्यासाठी बंधने असायची. परंतु कोपरगांव सारख्या ठिकाणी संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातुन अनेक मुली शिकल्या आणि आज त्या कर्तबगार महिला म्हणुन वावरत आहेत, ही खुप मोठी उपलब्धी आहे.
भविष्यात समाज व देश हिताचे कार्य करा. आपल्यासाठी जगताना समाजासाठीही जगा. मोबाईल गरजेचा आहे, परंतु त्याच्या किती आहारी जायचे याचे भान ठेवा. ध्येयापासुन वंचित होवु नका. चुकीच्या मैत्री पासुन सावध रहा. रडायला नाही तर लढायला शिका, असा मौलिक सल्ला कोल्हे यांनी यावेळी दिला. डॉ. मकरंद कुलकर्णी यांनी आभार मानले.