शेवगाव, ढोरजळगाव व चापडगाव मंडळात नुकसानीचे रॅण्डम पंचनामे सुरु करण्याची कसाळ यांची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : शेवगाव, बोधेगाव, भातकुडगाव, एरंडगाव, चापडगाव, ढोरजळगाव या सहा ही मंडळात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र महसूल व कृषी विभागाने पीक विम्याच्या अगावू रकमेच्या मागणीच्या प्रस्तावासाठी बोधेगाव, भातकुडगाव व एरंडगाव या तीनच मंडळात सलग तीन आठवडयाचा पावसाचा खंड पडल्याचे गृहित धरून तेथील पिकांच्या नुकसानीचे रॅण्डम पंचनामे सुरु केले.

त्यानुसार तालुक्याच्या खरिप पीकाच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार असून त्यानंतर विमा कंपनीकडून मंजूर रकमेच्या प्रमाणात पिक विमा रकमेची मदत संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. तथापि यावर्षी सर्वच मंडळात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील खरिप पिके अडचणीत सापडली असून दुष्काळी परिस्थितीचे संकट घोंगावत असताना महसूल व कृषी विभागाने दुजाभाव करत फक्त तीनच मंडळाचे रॅण्डम पंचनामे केले आहेत.

तेव्हा उर्वरित शेवगाव, ढोरजळगाव व चापडगाव याही मंडळात नुकसानीचे रॅण्डम पंचनामे करून शासनाच्या पिक विम्याच्या मदतीचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना व्हावा. अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांनी तहसिल कार्यालयात मागणी केली आहे.

या सुदर्भात सभापती कसाळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.२८) महसूल व कृषी विभागाकडे सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक हनुमान पातकळ, प्रदीप काळे, नितीन पायघन, संतोष पावसे, आबासाहेब कासुळे, संभाजी तिडके, अशोक झिरपे, मनोज तिवारी, अशोक मेरड, रामजी अंधारे आदींसह शेतकरी उपस्थित होते. नायब तहसिलदार रवींद्र सानप यांनी निवेदन स्विकारून आपल्या भावना वरिष्ठ स्तरावर पोचविण्याचे आश्वासन दिले.