इफकोच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक बिपीनदादा कोल्हे यांची इफको (इंडियन फारमर्स फर्टिलायझर्स को ऑप लि.) नविदिल्ली या संस्थेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली आहे. सर्वात युवा संचालक म्हणून महाराष्ट्राचा अभिमान वाढविणारी ही संधी आहे. देशातील अग्रगण्य सहकारी संस्थेची व्याप्ती देशात सर्वत्र असून नवनिर्वाचित संचालक मंडळांत महाराष्ट्र,तेलंगणा आणि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व कोल्हे करणार असल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

इफको ही देशातील खते, किटकनाशके, शेतीविषयक उत्पादनांची भारत देशासह जगातील सर्वात मोठी कंपनी असुन अलिकडेच त्यांनी नॅनो युरिया उत्पादन घेवुन शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे.

            इफको नविदिल्ली या संस्थेची संचालकपदाची निवडणुक पार पडली त्यात राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र गोवा आणि तेलंगणा राज्य मिळून संचालक पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांची संचालक म्हणून निवड झाल्याची घोषणा नवी दिल्ली येथे करण्यांत आली आहे.

           इफकोची वार्षिक उलाढाल सुमारे ४० हजार  कोटी रुपये असून सुमारे ३६ हजार सभासद शेतकऱ्यांशी इफकोचा दैनंदिन संपर्क असून भारत देशासह जगभरातील सुमारे साडेपाच कोटी शेतकऱ्यांपर्यंत इफकोची उत्पादने पोहोचलेली आहेत. इफकोच्या अन्य १४ संलग्न कंपन्या आहेत.

विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतुन आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात केली. कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्षपदावर कामाची संधी मिळाली, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक म्हणून देखील उत्तम काम सुरू आहे.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडुन सहकारी साखर कारखानदारीचे धडे घेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रश्न समजावून घेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा तरूण वयात हाती घेत खुल्या आर्थीक व्यवस्थेत सहकारासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा अभ्यास करत साखर व त्यावर आधारीत विविध रासायनिक उपपदार्थ, औषधी उत्पादने, सहवीज, बायोगॅसवर आधारीत वीज निर्मीती, संजीवनी बायो कंपोस्ट खत, पोटॅश, सीएनजी आदी प्रकल्प यशस्वीपणे राबवून शेतक-यांचे प्रती एकरी उस उत्पादन वाढीसाठी धडक कार्यकम हाती घेतला.

सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कोईमतुर तामिळनाडु या संस्थेचे उपाध्यक्ष, को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक म्हणूनही त्यांना कामाची संधी मिळाली आहे. ते उच्चशिक्षीत बी. ई. स्थापत्य अभियंते आहेत. त्यांनी सहकार क्षेत्रात कमी वयात चांगला अभ्यास केला आहे. इफकोचे यापूर्वी आर जी बी म्हणून त्यांनी संस्थेचा कामकाज अनुभव घेतला आहे, संचालक म्हणून आगामी काळात त्यांना या अनुभवाचा फायदा शेतकरी हितासाठी कामकाज करताना होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.