प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचा बुथ प्रमुखांच्या बैठकांवर जोर

मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती, विजयाची दिली खात्री 

शिर्डी प्रतिनिधी, दि. १२ : महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराची सांगता ही विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या बुथ कार्यकर्त्यांच्या बैठकीने करण्यात आली. प्रचाराची सांगता करण्यासठी मोठ्या नेत्याची सभा न घेता महायुतीने आपले बुथ कार्यकर्ते सक्रीय करण्यावर जोर दिला आहे. वाढत्या उन्हामुळे मतांच्या टक्केवारीत घट झाली आहे. मात्र जास्तित जास्त मतदान घडवून आणण्यासाठी बुथ कार्यकर्ते सक्रीय आवश्यक असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच मित्र पक्षांनी बुथ कार्यकर्ते सक्रीय करण्यावर भर दिल्याने महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. 

यासाठी नामदार दादा भुसे यांनी अनेक ठिकाणी बुथ बैठका घेतल्या असून बुथ कार्यकर्ते सक्रीय करण्यावर त्यांनी जोर दिला आहे. नेवासा तालुक्यातील बुथ कार्यकर्त्यांची बैठक नामदार दादा भुसे यांच्या उपस्थित घेण्यात आली. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन औताडे, बाळासाहेब पवार, राज लोखंडे यांच्यासह सर्वच प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना दादा भुसे यांनी सांगितले की, आपला बुथ कार्यकर्ता सक्षम असेल तर आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही. तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांचा विजय निश्चित असून मताधिक्य किती मिळणार एवढी औपचारीकता राहिली असल्याचेही सांगितले.

प्रत्येक विधानसभेत या बुथ बैठका घेण्यात आल्या असून यासाठी स्थानिक नेत्याची बुथ रचना कशी आहे. हे समजून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांनी बुथ नियोजनाची बैठक घेतली तर माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी देखील कोणत्या बुथवर काय काय अडचण आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोपरगावात शिवसेनेची देखील बुथ रचना ही सक्षम असल्याने या तिघांचा फायदा लोखंडे यांना होणार आहे. 

राहात्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपले कार्यकर्ते बुथवर सक्रीय केले आहे. राहाता विधानसभेत भाजपची बुथ रचना ही सक्षम बुथ रचना मानली जाते. प्रत्येक जिल्हा परिषद गटानुसार बुथ रचनेचा आढावा स्वतः नामदार राधाकृष्ण विखे घेत असून संगमनेर मध्ये देखील त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. संगमनेर मध्ये शिवसेनेच्या बुथची जबाबदारी विठ्ठल घोरपडे यांच्यावर असून भाजपचे तालुका प्रमुख वैभव लांडगे राष्ट्रवादीचे कपील पवार यांनी पक्ष कार्यालयात बुथ प्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक बुथच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बुथ प्रमुखांच्या जबाबदारऱ्या निश्चित करण्यात आल्या. 

अकोला विधानसभेत इतर विधानसभेच्या तुलनेत सर्वात जास्त ३०७ बुथ आहे. प्रत्येक बुथ मधील अंतर देखील जास्त असल्याने त्यानुसार भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेने स्वतंत्र बैठका घेत बुथवरील नियोजनाची माहिती यावेळी दिली. मतदार संघ जरी दुर्गम असला तरी जास्तीत जास्त मतदान कसे घडवून आणता येईल याबाबतचे नियोजन यावेळी करण्यात आले. आमदार किरण लहामटे यांनी बुथ कार्यकर्त्यांचा यापूर्वीच कामाला लागण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सुक्ष्म नियोजन केले असून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यात कुठेही कमी पडणार नसल्याचे सांगितले.

तर माजी आमदार वैभव पिचड यांनी बुथ प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी या बैठकीला भाजपा तालुका प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटानुसार नियोजन करण्यात आले. जूने व नवीन भाजप कार्यकर्त्यांच्या समन्वयाची जबाबदारी माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौर यांच्यावर देण्यात आली. 

श्रीरामपूर विधानसभेत माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाजपचे प्रकाश चित्ते, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी स्वतंत्र बुथ कार्यकर्ता बैठका घेत जास्तीत जास्त मतदान कसे होईल याबाबतचे नियोजन केले. तर शिवसेनेने देखील आपली बुथ रचना या ठिकाणी सक्षम पणे उभी केली आहे. याची जबाबदारी प्रशांत लोखंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांनी स्विकारली आहे.