शेवगावात लोकसहभागातून साकारतय भव्य शिवस्मारक

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शेवगावच्या  छत्रपती शिवाजी महाराज चौकातील निर्माणाधीन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे कोट्यावधी रुपये खर्चाचे अति भव्य असे काम लोकसहभागातून जोरात सुरू आहे. या भव्य अशा  स्मारकाचे शिल्प साकारत असताना दगडी किल्ल्याचे स्वरूप निर्माण करण्यात आले आहे. संपूर्ण स्मारक हे घडविलेल्या काळ्या दगडामध्ये निर्माण झालेले आहे. या किल्ला शिल्पाचा काही भाग राजस्थानी लाल दगडामध्ये बनविण्यात येणार आहे.  तो लाल दगड बसविण्यास रविवार दिनांक १९ मे ला विधिवत  सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाअभिषेकाचे नियोजन करून लाल दगडाची पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये प्रत्येक जातीच्या व समाजाच्या सहकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले. कुठलीही जात धर्म पंथ भेद न मानता फक्त हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे असे एक स्वप्न उरी बाळगून सर्व मावळे जीवाचं रान करत होते. घरादारावर तुळशी पत्र ठेवून डोंगरदर्‍या फिरून स्वराज्य घडवत होते.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील स्मारकाचे निर्मितीमध्ये प्रत्येक जाती समाजाचा सहभाग असला पाहिजे व त्या  प्रत्येकाला योग्य तो मानसन्मान मिळावयास हवा या हेतूने स्मारक समितीने  स्मारक उभारणीच्या प्रत्येक टप्यांमध्ये वेगवेगळ्या  समाजाच्या प्रतिनिधींचा गौरव करून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला आहे. अशा प्रकारे संपूर्ण स्मारक उभारणीपर्यंत संपूर्ण अठरापगड जातीच्या सर्व समाजांचा स्तुत्य सहभाग या निर्मितीमध्ये घडवून आणला आहे. यातून संपूर्ण समाजाला सामाजिक बांधिलकीचा व एकोप्याचा  संदेश  स्मारक समितीने  दिला आहे.

            यावेळी  लाल दगड लावण्यासाठी येथील सकल धनगर समाज, सकल शिंपी समाज  व सकल बुरुड समाज  या तीन  घटकांना बहुमान देऊन त्यांच्या हस्ते अभिषेक करून त्यांच्या हस्ते दगड लावण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला आहे. या तीनही समाजाच्या  निमंत्रितांनी आपापल्या लेकीबाळींना, पैपाहुण्यांना यावेळी आवर्जून पाचारण केले होते. यावेळी सर्व समाजातून स्मारक समिती उभारत  असलेल्या या भव्यदिव्य  स्मारकाची प्रशंसा करत दरवेळी  वेगवेगळ्या समाजांना जो बहुमान देऊन लोकसहभागातून हे काम होत आहे याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.

     भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक  शेवगाव परिसराचा  मानबिंदू ठरणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या पाच स्मारकांमध्ये  या स्मारकाचा समावेश असणार आहे. असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. यावेळी जगदीश धूत, अरुण पाटील लांडे, डॉ. नीरज लांडे, प्रा.नितीन मालानी, नवनाथ कवडे, बंडू रासने, दत्ता फुंदे, अमोल घोलप, गणेश कोरडे, राहुल सावंत, राहुल वरे, हरीश शिंदे ,अमोल माने, मच्छिंद्र बर्वे , मुन्ना बोर्डे, गणेश भिसे, सुभाष बाचल, मुकुंद उरणकर अशोक उरणकर यांचेसह पंचक्रोशीतील  शिवभक्त मोठ्या संख्येने  उपस्थित होते.