क-हेटाकळीच्या महिलांचा अवैध दारू आणि जुगार अड्याविरुध्द एल्गार

ग्रामपंचायत मासिक बैठकीत दारूबंदी ठराव एकमताने मंजुर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : तालुक्यातील क-हेटाकळीमध्ये सर्रास अवैध दारू विक्री आणि जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ते तात्काळ बंद करावेत अन्यथा गावातील महिला शेवगांव पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलन करतील असा इशारा येथील महिलांनी लेखी निवेदनाव्दारे शेवगाव पोलीसांना दिला आहे.

        निवेदनात म्हटले आहे की, दारू आणि जुगारामुळे आमच्या गावातील अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दारुडे रस्त्यावर किंवा गल्लीत येवून आरडा ओरडा करतात त्यामुळे गावामध्ये सतत भांडण तंटे होत असतात. दारूडे आणी जुगारी यांच्या मुळे गावाच्या परिसरामध्ये चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.  गावात सुरु असलेले हे व्यवसाय बंद करण्यात यावेत अन्यथा आपल्या कार्यालया समोर आम्ही सर्व महिला आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर सरपंच  सुनीता गटकळ, ग्रामपंचायत सदस्या सुनिता दाभाडे, जयश्री ससाने, रेणुका ससाने, उज्वला ससाने, नानीबाई ससाने, उषाबाई ससाने, रूपाली ससाने, लताबाई ससाने, भामाबाई ससाने, सुनिता तुपविहीरे, सीमा मोहिते, ताई खंडागळे, विजयमाला गटकळ यांच्या सह गावातील महिलांच्या मोठ्या प्रमाणावर सहया आहेत.

दरम्यान २२ मे रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींग मध्ये गावात दारूबंदी झाली पाहिजे असा ठराव मांडण्यात आला. सदर ठराव एकमताने मंजुर करण्यात आला आहे .  सर्व संबंधीत आधिकऱ्यांना पत्रव्यवहार करून ठरावाची नक्कल पाठविण्यात आली  आहे.


“अवैध दारू विक्री करणारे, जुगार चालक यांना अनेक वेळा समजाऊन सांगूनही ते ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे न झाल्यास गावातील प्रत्येक घरातील महिलांना बरोबर घेवून शेवगांव पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन केले जाईल महिलांचा मान सन्मान व्हावा व गाव कायम तंटामुक्त रहायला हवे. “
सुनिता संजय गटकळ
सरपंच , ग्रामपंचायत क-हेटाकळी