माय आणि मातीचे आरोग्य जपण्याचा समाजाने वसा घ्यावा – राहीबाई पोपेरे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ :  ‘चमक असणाऱ्यात  धमक नसते हे ध्यानात घेऊन निसर्गाच्या शाळेने शिकवलेले शहाणपण उमजून घेत माय आणि माती यांचे आरोग्य जपत देशाची भावी पिढी निरोगी करण्याचा वसा समाजाने घ्यावा’, असे प्रतिपादन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.

  येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या गुणवतांच्या  गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे विश्वस्त हरीश भारदे अध्यक्षस्थानी होते. कचरदास सारडा, गोरक्षनाथ बडे, रमेश पोरवाल यांच्या सह शिक्षक, पालक ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

पोपेरे पुढे म्हणाल्या, मी शाळेची पायरी चढले नसले तरी निसर्गाच्या शाळेने मला शहाणपण शिकवले. माती शिवाय शेती अशक्य आहे,  कीटकनाशके, रासायनिक खते यामुळे मातीचे आरोग्य बिघडले तर भावी पिढी कुपोषित असेल, हे ओळखून सर्वांनी गावरान बियाणे व नैसर्गिक शेतीकडे वळावे, विद्यार्थ्यांनी जंक फूडच्या मागे न लागता सकस आहार घ्यावा तरच उद्याची पिढी सक्षम होईल.

यावेळी इयत्ता दहावी मधील गुणवंत श्रेया भवर, समृद्धी थोरे, अभिनव जगदाळे, इयत्ता बारावी विज्ञान मधील राधिका अंचवले, सुमित चव्हाण, समृद्धी वाळूंजकर, वाणिज्य शाखेतील साक्षी काथवटे, महेश कातकडे, जान्हवी डहाळे तर कला शाखेतील अथर्व काळे, प्रियंका सुपारे, फिरदोस पटेल, तसेच श्रीसिद्धी जयस्वाल, श्रेया बोरुडे या गुणवंतांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेल्या रांगोळी व चित्रकला प्रदर्शन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्राचार्य शिवदास सरोदे यांनी प्रास्ताविक केले, निलेश मोरे यांनी सुत्र संचलन केले, तर उमेश घेवरीकर यांनी आभार मानले.