शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा म्हणून उर्वरित आयुष्य जगताना अनेकदा कुटुंब आणि समाज व्यवस्थेकडून मर्यादा येतात. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मोठा भाऊ गौरव यांच्या मृत्यूने पोरक्या झालेल्या विधवा भावजयीचा तीच्या मुलासह पत्नी म्हणून स्वीकार करून येथील सौरभ शिदे या अविवाहित तरुणाने रुढी परंपरांना छेद देत समाजा समोर आदर्श ठेवला आहे.
गौरव शिंदे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी गंगा खुळे हिच्याशी झाला. दोघांचा सुखाचा संसार सुरू होता त्यांना दोन गोंडस मुलेही झाली. त्यामुळे त्यांचा संसार आनंददायी बनला होता या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि गौरव यांचे निधन झाले. शिंदे व खुळे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. गौरवच्या मृत्युनंतर शिंदे व खुळे कुटुंबीयांनी एकत्र बसून तरुणपणीच विधवा झालेल्या गंगाच्या उर्वरित आयुष्याचा विचार करून मयत गौरवचा धाकटा भाऊ सौरभ याच्याशी तीचे लग्न लावण्याचा प्रस्ताव मांडला.
त्यानेही आपण गंगासह तिच्या दोन्ही बाळाचा स्विकार करण्यास तयार असल्याचा मनाचा मोठेपणा दाखविला. हा अनोखा मंगल विवाह सोहळा शेवगाव येथे दोन्ही कुटुंबियांच्या व मित्र मंडळीच्या उपस्थित नुकताच पार पडला. यावेळी माजी नगरसेवक सागर फडके, सिताराम लांडे, वसंत देवधर, बाळासाहेब काकडे, शरद मडके यांच्यासह नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होती.