शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : शासनाच्या एक रुपयात पिक विमा या महत्त्वाकांक्षी योजनेत शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या खरिप हंगामात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला मात्र त्यातील केवळ नाम मात्र शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळाला.
शेवगाव तालुक्यात कापूस तुर उडीद आदि पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना संबंधित विमा कंपनीने ही पिके विम्याच्या लाभांपासून वगळली आहेत. त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यात विमा कंपनी बरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षपणाच्या भूमिकेबद्दल प्रचंड असंतोष आहे. याबाबत आपण राज्याचे उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी यांचे लक्ष वेधणार असून या शेतकऱ्याना पिक विम्याचा सरसकट लाभ मिळावा अशी आपली मागणी असून याबाबत वेळीच सकारात्मक निर्णय झाला नाही तर शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याचा निर्धार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केला. शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार घुले बोलत होते.
यावेळी पं.स.चे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ताहेर पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
घुले पुढे म्हणाले की, मागील वर्षीच्या २०२३ -२४ च्या खरीप हंगामात शेवगाव तालुक्यातील ४६ हजार ९७८ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेऊन ९० हजार ५३४ अर्ज दाखल केले होते.
यावेळी राज्य सरकारचा २५ कोटी ५०लाख ९२ हजार ३४८ रुपयांचा तर केंद्र सरकारचा १३ कोटी ८३ लाख रुपयांचा हिस्सा असा एकूण ३९ कोटी ३५ लाख रुपये ओरिएंटल विमा कंपनीस भरण्यात आले आहेत. एवढी रक्कम विमा कंपनीस मिळून देखील त्यापोटी शेतकऱ्याच्या पदरात अपेक्षित पिक विमा रक्कम मिळाली नाही . त्याबद्दल शेतकऱ्यात मोठा रोष असल्याने शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा सरसकट लाभ मिळावा या मागणीसाठी आपण संबंधितांकडे आग्रही भूमिका मांडणार असल्याचे घुले म्हणाले.
सध्या परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आपण शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न समजावून घेत आहोत. आतापर्यंत तीस पस्तीस गावांना भेटी दिल्या असून या परिवर्तन जनसंवाद यात्रेस ठीक ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बहूधा सर्वच ठिकाणी पिण्याचे व पाट पाणी रस्ते, वीज आदि समस्या गंभीर बनल्याच्या जनतेतून तक्रारी आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात शेवगाव तालुक्यात १५ गावे व ८० वाड्या वस्त्यांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. अद्याप या भागावर वरुण राजाची समाधान कारक कृपा झालेली नाही तोच प्रशासनाने ३०जून पासून तालुक्यात सुरू असलेले टँकर बंद केले आहेत. सध्या अनेक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असल्याने टँकर सुविधा देखील लगेच सुरू करणे आवश्यक असल्याच्या मागणीबाबतही पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकानी नुकतीच आपली भेट घेतली असून त्यांनी सुद्धा खत कंपन्या लिक्विड खतांच्या लिकिंगची सक्ती करत असल्याचे गाऱ्हाणे मांडले आहे. कृषी सेवा केंद्रांना त्यामुळे नाहक बदनाम व्हावे लागते. यात शेवटी शेतकरीच भरडला जातो. त्यामुळे त्यांच्या मागणीचा पाठपुरावा देखील जिल्हाधिकारी व कृषी खात्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती घुले यांनी यावेळी दिली.