शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : महसूल विभागातील वर्ग ३ व ४ श्रेणीच्या कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार ता. १५ पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु आहे. शेवगाव तहसील कार्यालयातील १५ कर्मचारी संपात सहभागी असून आज उपोषणाचा तीसरा दिवस आहे.
महसूल विभागातील रिक्त असणारी पदे न भरल्यामुळे सध्या कर्मचा-यांवर कामाचा ताण पडत आहे. शासनाने रिक्त पदे तात्काळ भरावीत, महसूल सहायक यांचा ग्रेड पे तलाठया एवढा करावा, नायब तहसीलदारपदाची वेतनश्रेणी वाढवावी, चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांना २५ टक्के तलाठी पदे देऊन पदोन्नती ड पदाचा दर्जा दयावा आदी मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करुन संप पुकारला आहे.
या कामबंद आंदोलनामुळे सध्या अनेकांची कामे खोळंबली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यामुळे वेगवेगळ्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते
त्यातच लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी देखील महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या आंदोलनामुळे सर्वांचाच खोळंबा झाला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसुल कर्चारी संघटनेचे शेवगाव शाखेचे अध्यक्ष श्रीकांत गोरे, उपाध्यक्ष विजयसिंह नेमाणे, सचिव शशिकांत देऊळगावकर, महिला संघटना तालुका प्रमुख अर्चना गर्जे, संदिप चौधर, विजय चव्हाण, मंगल पवार , सुरेखा महापुरे, अंदसिंग बुसुंगे, दत्तात्रय पालवे, गणेश हुलमुखे, सुरेश बर्डे, सदानंद बारसे, संजय गजभिव आदी सहभागी झाले.