आमदार काळेंच्या अपयशाचा रवंदेत भांडाफोड – ऋषिकेश कदम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : हजारो कोटींच्या वल्गना करणाऱ्या विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या निष्क्रिय कारभाराचा त्यांनी स्वतःच भांडाफोड केला आहे. आपण न केलेल्या का माचे श्रेय घेण्यासाठी रवंदे गावात फलक लावत आ.काळे यांनी केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप केला अशी घणाघाती टीका रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी केली आहे.

आमच्या गावात आम्ही राबवलेल्या योजना आणि विकासकामे आमदार त्यांच्या नावाने खपवत आहे. प्रसिध्दी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा जनतेच्या हक्काचा निधी सोडा पण आता ग्रामपंचायत स्तरावरील पण निधी आमदार काळे आपण आणला असे सांगत असतील तर हास्यास्पद आहे. जलजिवन मिशन योजना सबंध देशात सुरू आहे. इतर हजारो गावात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी हा निधी शासनाला देणे बंधनकारक आहे त्याचे श्रेय आपण घेऊन आपण अज्ञान दाखवू नये असा खोचक सल्लाही कदम यांनी आ.काळे यांना दिला आहे.

यापूर्वी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी अनेक कामे मार्गी लावली त्यासाठी सहकार्य केले पण ग्रामपंचायत स्तरावरील आमच्या कामाचे श्रेय त्यांनी घेतले नाही. आपण स्वतः कामे करावी आणि ती जनतेसमोर मांडवी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामांचे श्रेय घेऊन ती कामे मी केली असा खोटा गवगवा काळे यांनी करू नये.स्थानिक स्वराज्य संस्थाना त्यांचा हक्काचा निधी मिळतो त्यावर आपले नाव लावण्यासाठी अट्टाहास आमदारांनी करू नये.

जर आमदार काळे यांनी विकास केला असता तर असे गावोगावी ग्रामपंचायतने केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी त्यांना फलकबाजी करावी लागली नसती. सर्व मतदारसंघाला ठाऊक आहे जो नियमित निधी अनेक योजनांना आला आहे तो येतच असतो त्यात मी ते कामे केले असे भासवने व श्रेय घेण्यासाठी धडपड करने हा निव्वळ प्रसिद्धीचा हव्यास आहे. जो त्यांनी आता तरी बंद करावा कारण सत्य जनतेला दिसते आहे असेही शेवटी कदम म्हणाले.