अमोल मिटकरी यांच्यावर कोपरगावमध्ये गुन्हा दाखल

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे येथील सप्ताहामध्ये महंत रामगिरी महाराज यांनी महंमद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याने वादंग सुरु असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल खालच्या शब्दात टिका करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाषा बोलल्या बद्दल कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

 या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महंत रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून महंमद पैगंबर यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अशोभनीय असुन भगवे कपडे घालुन दोन समाजात तेढ निर्माण केले आहे. त्यांनी केलेल्या असे म्हणत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर मिटकरी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामगिरी महाराज यांच्यावर खालच्या भाषेत टिका करीत दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यावरन  राहता तालुक्यातील पिंपळवाडी येथील प्रवचनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसुधन महाराज यांनी अमोल मिटकरी यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने नगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. 

 एका बाजुला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महंत रामगिरी महाराज यांच्यासह एकाही संतमहंतांच्या केसाला धक्का लागु देणार नाही म्हणाले असतानाच त्यांच्याच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते व अजित पवार यांचे विश्वासू सहकारी अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराज यांच्या बद्दल केलेले वादग्रस्त विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याने अजित पवार यांच्या गटाला अडचणीत आणणारे ठरले आहेत तर मिटकरे यांच्या वक्तव्याचा महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थकांनी निषेध व्यक्त केला आहे. तर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल झालेला गुन्हा अकोले पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे.  दरम्यान कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये अमोल मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.