मोबाईलच्या विळख्यातून पिढीची जपवणूक काळाची गरज – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस आणि स्पोर्ट्स क्लब आयोजित युवानेते विवेक कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा वर्ष तिसरे उद्घाटन समारंभ माजी आमदार. स्नेहलता कोल्हे उपस्थितीत पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित स्पर्धकांच्या उल्लेखनीय गर्दीने खेळाचे महत्व डिजिटल युगातही टिकवण्यासाठी कोपरगाव सज्ज आहे अशी भावना उपस्थितांची होती.

महाराष्ट्रातील व बाहेरील अनेक स्पर्धक आलेले असून वय वर्षे पाच पासून साठ वयाचे स्पर्धक सहभागी झाले आहेत. या खेळाची जगातील एक प्रसिद्ध बैठा खेळ म्हणून ओळख आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक विद्यार्थी युवा पिढी ही मोबाईलमद्ये अडकून जाते त्यातून गैर मार्गाला अनेकांचे आयुष्य जाताना दिसते. मात्र या सर्व गोष्टींना टाळून आपण खेळाकडे वळून बौद्धिक विकासाला महत्व दिले त्याबद्दल आपले अभिनंदन असे गौरवोद्गार कोल्हे यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्याने जनसेवेची वाट चालणाऱ्या स्नेहलता कोल्हे यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळून या स्पर्धेचे उद्घाटन केले.

युवानेते विवेक कोल्हे यांनी नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. आजची पिढी जर योग्य मार्गाने पुढे गेली तर राष्ट्र भक्कम होणार आहे. नव्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतो याची जाणीव ठेवून कृती केल्यास त्यातून सामाजिक जडणघडण उत्तम होते. बुद्धिबळ हा खेळ विचारपूर्वक खेळावा लागतो. पटावर  स्पर्धक आपली वैचारिक स्थिरता किती ठेवतो त्यावर यश अवलंबून असते असेही सौ.कोल्हे शेवटी म्हणाल्या.

यावेळी विजयशेठ बंब, राजेश ठोळे, यश विसपूते, संभाजी बोरनारे, नितीन सोळके, प्रमोद वाणी, संकेत गाडे, महेश थोरात, राजेंद्र कोळपकर, राजेंद्र कोहकडे, रंजय त्रिभुवन, उदय देशपांडे, सुमित गुप्ता, रमेश येवले, किरण कुलकर्णी, शिवप्रसाद घोडके, गुरजित सिंग, सागर गांधी, अतुल शालीग्राम, शिवप्रसाद काळे, जसविंदर सिंग आदींसह स्पर्धा समितीचे सर्व सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.