शेवगाव बस स्थानकावर पोलिस मदत केंद्र सुरू

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : शेवगाव बस स्थानकात पोलिस निरीक्षक समाधान नागरे व बस स्थानक प्रमुख अमोल कोतकर यांच्या हस्ते काल बुधवारी पोलिस  मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शेवगाव  हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने येथील बस स्थानकावर रात्रंदिवस एसटी गाड्याची ये जा  असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. अबाल वृद्ध,महिला,शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या गर्दीने हे बस स्थानक  गजबजलेले असते.

या गर्दीचा फायदा अनेक अवैध धंदेवाईक घेत असतात. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे, पाकीट मारणे, बॅग व वाहन चोरीच्या घटना तसेच रात्री अपरात्री अबाल वृद्ध, महिला यांच्या छेडछाडीचे प्रकार सातत्याने घडत असतात. त्यामुळे नव्याने बांधकाम झालेल्या या बस स्थानकात पोलीस मदत कक्ष असावे अशी प्रवाशांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून  होती.

बस स्थानकाचे अधिकारी देखील अनेक दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर याचा पाठपुरावा करत होते. त्यावर  सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज लांडे व भाग्यलक्ष्मी जाळी उद्योग समूहाचे संचालक निलेश बोरुडे यांनी बस स्थानकात मदत कक्ष तयार करून   दिल्याने लगेच सोय झाली. यातून  बस स्थानकावर होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत होणार आहे. उदघाटन प्रसंगी या ठिकाणी २४ तास पोलिस  सेवा उपलब्ध करण्याचे आश्वासन पोनि समाधान नागरे  यांनी दिले. तेव्हा प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. 

        यावेळी पोलीस निरीक्षक नागरे, अमोल कोतकर, किरण शिंदे, लटपटे, जगदीश धूत, बंडूशेठ रासने, डॉ. कृष्णा देहाडराय, दत्तात्रय फुंदे, सुभाष लांडे, शरद जोशी, किरण काथवटे, अमोल माने, ऋषिकेश सोनवणे, राजेंद्र वडते, सुभाष गवळी, प्रकाश खेडकर व प्रवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत आव्हाड यांनी केले तर निलेश बोरुडे यांनी आभार व्यक्त केले.