कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : मुक्त अर्थव्यवस्थेमुळे कृषी क्षेत्रात जगात वेगवेगळे बदल होत आहेत, आपल्याकडील शेतकरी संघानी या बदलांचा अभ्यास करून दोन ते सहा गुंठ्यावर या प्रयोगात्मक शेतीचा अवलंब करावा त्यासाठी स्वतंत्र विकास समिती निर्माण करावी, शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ हा पुढील पाच ते दहा वर्षात नवी दिशा झेप घेणारा संघ व्हावा अशी अपेक्षा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली. सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कोपरगाव येथे पार पडली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, विषय पत्रिकेवरील सर्व नऊ विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले, उपाध्यक्ष बाजीराव मांजरे, तज्ञ संचालक प्रकाश सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, मागील सभेचे इतिवृत्त व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी वाचले सर्व सभासदांनी त्यास एकमुखाने मंजुरी दिली. याप्रसंगी विजय जाधव, अशोकराव भाकरे, राहुल दंडवते, तुषार गोरड यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सदस्य व संघाचे संचालक बबनराव निकम यांनी जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या इफको नवीदिल्ली या संस्थेच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला तो टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, शेतीत पुढील पाच वर्षात अनेक बदल अपेक्षित आहेत. नवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. व्हर्टिकल, हायड्रोपोनिक, क्लोन, फर्टीलेयर, मल्टी लेयर या फार्मिंग पद्धती येथील शेतकऱ्यांना आत्मसात कराव्या लागतील, या संघाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी काळाच्या पुढे जात तरुणपणीच जागतिक बदलांचे चिंतन करत येथील शेतकऱ्यांना त्यासाठी कसे तयार करावे हा विचार दिला, सहकाराच्या मदतीने कोपरगावचा कायापालट करण्यासाठी विशेष काळजी घेतली, अनेक पथदर्शक प्रकल्प राबवले म्हणून ते सहकारातील खऱ्या अर्थाने रत्न होते. त्यांची आठवण सर्वांनाच प्रकर्षाने होते.
आज इफको या संस्थेने कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदलांचा वेध घेत त्यानुरूप खते, कीटकनाशके, आदी तयार करून शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. शेतकरी संघांना बदलावे लागेल तरच त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. सध्या सर्वच क्षेत्रात वेगवान स्पर्धा आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी प्रयोगात्मक शेती करत शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेत, मत्स्य, शेळी, कुकुट पालनात लक्ष घालून शेतीला जोडधंदा निर्माण करण्यावर भर दिला आहे. चेअरमन अंबादास देवकर व व्हा. चेअरमन बाजीराव मांजरे आणि संचालक मंडळांच्या कामाचे कौतुक केले.
सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, माजी उपाध्यक्ष अरुण येवले संजय होन, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, संचालक विश्वासराव महाले, रमेश आभाळे, त्र्यंबकराव सरोदे, निलेश देवकर, सचिन कोल्हे, रमेश घोडेराव, प्रदीप नवले, राजेंद्र बागुल, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे संचालक संभाजीराव गावंड, विलास कुलकर्णी, चंद्रकांत देवकर, बबनराव निकम, नानासाहेब थोरात, रावसाहेब थोरात, राजेंद्र भाकरे, विठ्ठल कोल्हे, रामदास शिंदे, शिवाजी कदम, रघुनाथ फटांगरे, देविदास हुडे, हिरालाल गायकवाड सौ. प्रमिला प्रभाकर बढे, सौ. ताई भागिनाथ लोंढे, विजय गाडे, प्रकाश गोरडे, दत्तात्रय सावंत, प्रभाकर बढे, वैभव गिरमे, चंद्रभान रोहम आदी सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, शेवटी उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी आभार मानले, सूत्रसंचालन व्यवस्थापक हरिभाऊ गोरे, भिवराज जावळे यांनी केले.