राहाता प्रतिनिधी, दि. १७ : खडकेवाके गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून शनिवार १४ डिसेंबर रोजी मेंढपाळाच्या कळपातून एका मेंढराला आपली शिकार बनवल्यानंतर बिबट्या सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेतात पिकाला पाणी भरणाऱ्या एका शेतकरी महिलेला काहीशा अंतरावर बिबट्याचे दर्शन होताच महिलेने शेजारच्या वस्तीवर पळ काढला. भीतीने सदर महिला चक्कर येऊन पडली असल्याचे बोलले जात आहे. या घटणेने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे.
सदर घटना घडून गेल्यानंतर खडकेवाके गावातील संदीप सुरेश लावरे या शेतकऱ्याच्या गोठ्यात मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून दोन कालवडींना शिकार बनवले. यामध्ये दोन्ही कालवडी मृत्युमुखी पडल्या. कालवडींना खुट्याला बांधलेले असल्याने गोठ्यातून कालवडीला ओढून बाहेर नेणं बिबट्याला शक्य झालं नाही. त्यामुळे बिबट्याने एका कालवडीचा मागचा एक पाय तर दुसऱ्या कालवडीचा पुढचा एक पाय ओढून नेला आहे.
खडकेवाके गावात बिबट्याचे वास्तव्य वाढले असून शेतकरी बांधवांना तसेच शेतमजुरांना शेतीचे कामे करणे कठीण बनले आहे. त्याचबरोबर पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे रक्षणाची चिंता असते. रात्री हाडे गोठवणारी थंडी त्यात बिबट्याची दहशत यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचे बाहेर पडणे कठीण होत आहे. याचा फायदा घेत बिबट्या पशुधनावर डाव टाकून हल्ला करून आपली शिकार बनवत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे,
शेतकरी संदीप सुरेश लावरे यांच्या दोन कालवडी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने या शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन घटनेचा पंचनामा केला. दोन कालवडी एकाच वेळी एका बिबट्याची शिकार होणे शक्य नसल्याने हल्लास्थळी दोन बिबटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे मेंढपाळांची रात्रीची झोप उडाली आहे. खडकेवाके परिसरात व गावात वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.