शेवगावात शिवजयंतीची तयारी पूर्ण

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपतींच्या जयंती उत्सवानिमित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची शहरात मोठी लगबग सुरु आहे. शनिवारी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता जगदंब प्रतिष्ठानचे स्वयंसेवक शिवनेरी येथून पायीशिवज्योत आणणार आहेत. या ज्योतिचे संत गाडगे महाराज चौकात स्वागत करुन शहरातील प्रमुख मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

रविवारी  सकाळी नऊ वाजता सद्गुरु श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक ह भ प राम महाराज झिंजूर्के यांचे मार्गदर्शनाखाली येथील स्वराज्य मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात पालखी मिरवणूक, छत्रपती मूर्ती  पूजन व  महाराजांच्या जीवन चरित्रपर  शाहीर कल्याण महाराज काळे यांचे पोवाडयाचे कार्यक्रम होणार आहे, तसेच यावेळी  स्वराज मंगल कार्यालयात रोटरी क्लबच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी सहाला छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती व फटाक्याच्या आतषबाजीत शहरातून मिरवणुक काढण्यात येणार  आहे. शेवगावातील सर्व प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी कमानी उभारण्यात येत असून आकर्षक विद्युत रोषणाईचा झगमगाट करून भगवे ध्वज, पताका उभारून शहर भगवेमय करण्यात येत आहे.

  शहरात सुमारे दीड कोटी रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा स्मारक समितीच्या वतीने देखील शिवछत्रपती चौकात सकाळी दहाला मान्यवरांच्या हस्ते  छत्रपतींच्या अर्ध पुतळ्यास अभिषेक घालून तेथेही शिवरायांच्या पोवाड्याचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जुन्या बाजार तळावर भरणारा रविवारचा आठवडे बाजार यावेळी खंडोबा मैदानावर भरवण्यात येणार असल्याचे नगर परिषद व उत्सव समितीने जाहीर केले आहे.