विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी पीएसीएस व एफपीओ अंतर्गत व्यवसाय सुरू करून प्रगती साधावी- बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी सहकार मंत्रालयामार्फत ४८ मोठे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक विकासासाठी व विस्तारासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने पीएसीएस व एफपीओ अंतर्गत विविध १५१ व्यवसाय सुचवले असून, कोपरगाव तालुक्यातील सक्षम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी व देशात नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.  

केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने प्राथमिक सहकारी संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी सुचवलेले विविध प्रकारचे १५१ व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी (२२ सप्टेंबर) एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी ए. डी. काटे, नाशिक येथील कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भूषण निकम यांनी केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (पीएसीएस) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन-एफपीओ) अंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी करावयाच्या व्यवसायाची सविस्तर माहिती दिली.

पाहुण्यांचे स्वागत बिपीन कोल्हे तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, माजी उपाध्यक्ष साहेबराव कदम, संचालक रमेश आभाळे, सतीश आव्हाड यांनी केले. बहादरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हरिदास रहाणे यांचा बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक कारखान्याचे सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी केले.

केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व सहकारी संस्थांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले असल्याचे सांगून बिपीन कोल्हे म्हणाले, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी कष्टकरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजातील शेवटच्या घटकाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व त्यांची प्रगती व्हावी, यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकारी संस्थांचे मोठे जाळे निर्माण करून या संस्था नावारूपाला आणल्या.

स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांचे आदर्श विचार जपत संजीवनी उद्योग समूह शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबवीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम व ऐतिहासिक योजना सुरू केल्या आहेत. गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे शेतकऱ्यांच्या व गावच्या विकासात मोठे योगदान आहे. या सहकारी संस्थांना उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी १५१ व्यवसाय सुरू करण्याची संधी देणारी महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी हाती घेतली आहे.

या योजनेअंतर्गत सहकारी संस्थांना पेट्रोल पंप, खत, बी-बियाणे व इतर कृषी निविष्ठा विक्री केंद्र, मायक्रो एटीएम सेंटर, सुपर मार्केट, जेनेरिक औषधी केंद्र, गॅस वितरण, कॉमन सर्व्हिस सेंटर, सेंद्रिय शेती, मत्स्य व्यवसाय आदी १५१ व्यवसाय सुरू करता येणार आहेत. त्यासाठी नाबार्डमार्फत मोठा निधी मिळणार असून, सहकारी संस्थांनी हे व्यवसाय सुरू केल्यास त्यातून सहकारी संस्था व सभासद शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. हे १५१ नवीन व्यवसाय सुरू करण्याआधी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना केंद्र सरकारच्या ऑरगॅनिक संघ, राष्ट्रीय बीज सहसमिती व एक्सपोर्ट संघाचे सभासद व्हावे लागणार आहे.

त्यासाठी शेअर्स खरेदी करावे लागणार असून, ‘अ’ वर्ग प्राप्त सक्षम सहकारी संस्थेला शेअर्स खरेदीसाठी लागणारी अर्धी रक्कम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्वत: भरेल. तसेच शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी (फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन-एफपीओ) स्थापनेसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून तज्ज्ञांना द्यावी लागणारी रक्कमही कारखान्यातर्फे देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. बिपीनदादा कोल्हे यांच्या या घोषणेबद्दल कैलास रहाणे यांनी सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले.     

प्रारंभी बिपीन कोल्हे व अन्य मान्यवरांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी नाना गव्हाणे, प्रकाश गोर्डे, अनिल खालकर, देवराम गवळी, साहेबराव शिंदे, साहेबराव पाचोरे, कैलासराव रहाणे, हरीदास रहाणे, अर्जुन गोसावी, रमेशराव आभाळे, शिवाजी गवळी, अण्णा गुरसळ, कर्णासाहेब वक्ते, दादा चव्हाण, चिलीया गुरसळ, अशोक पवार, आबा पवार, सतीश आव्हाड, संजय आभाळे, रंगनाथ उगले, धर्मा शिंदे, काका पवार, बाळासाहेब चांडे, चंद्रभान शिंदे, संजय दिघे, काका पवार, पांडुरंग पवार, अरुण कदम, कैलास सहाणे, किरण कोळपे, कारभारी कोळपे, भानुदास पानगव्हाणे,

पुंजाजी राऊत, शिवाजी चव्हाण, शांताराम कदम, संजय दिघे, यशवंत संवत्सरकर, भाऊसाहेब आढाव, साहेबराव कदम, शशिकांत सोनवणे, धोंडीबा सांगळे, माधव सांगळे, भाऊसाहेब गीते, डॉ. वरकड, आबा दवंगे, शिवाजी दवंगे, सहाणे, निमसे, प्रशांत वाबळे, शंकरराव कदम, शांताराम कदम, माधवराव गोसावी, साहेबराव तिरसे, अण्णा निकम, साहेबराव सानप, बाळासाहेब सानप, उत्तम पाचमोडे, दगुनाथ गायकवाड, रंगनाथ अप्पा लोंढे, नारायण लोहकणे, दातीर, केंद्रे, गणेश बारहाते आदींसह तालुक्यातील विविध गावांतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.