शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : वंजारी समाजातील महिलांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषेत समाज माध्यमातून अपशब्द वापरून बदनामी करणाऱ्या व समाजाच्या भावना दुखविणाऱ्या सचिन लुगडे याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत शेवगाव शहर व तालुक्यातील सकल वंजारी समाजाच्या वतीने गुरुवा पोलीस ठाण्यात प्रमुख कार्यकर्त्यांनी जाऊन पोलिसांना याबाबत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
याबाबत गुन्हा दाखल करण्यास संबंधितांनी टाळाटाळ चालविल्याने भाजपचे राज्यसचिव अरुण मुंडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्याचे सांगितले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिव्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, वंचितचे शहराध्यक्ष प्रितम गर्जे यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सचिन लुगडे पूर्ण नाव माहिती नाही. याच्यावर भारतीय दंड संहिता 292 (2), 505 (2), माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम 2008 कलम 67 अन्वये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सचिन लुगडे नामक इसमाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून वंजारी समाजातील महिलांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत खालच्या पातळीवर जाऊन पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे समस्त समाजात संतापाचे वातावरण तयार झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपचे राज्य सचिव अरुण मुंडे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड, अशोक धायतडक, शिवाजी खेडक, कैलास बुधवंत, संजय बडदे, राजेंद्र नाईक, नंदकुमार मुंडे, सुरेश बडे, रामकिसन कराड, अंकुश ढाकणे, नितीन फुंदे, रवींद्र उगलमुगले, अमोल पालवे, शरद सोनवणे, रणजीत घुगे, केशव आंधळे, गणेश गर्जे, कैलास सोनवणे, अंबादास ढाकणे, प्रितम नाईक, सचिन महाजन आदींसह समाज बांधव उपस्थितीत होते.