मनापासून केलेल्या कामातच देव आणि राव भेटतो – भास्करराव पेरे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : जसं आई झाल्यानंतर आपोआप आईपण कळत जातं; तसं आपल्या गरजाच आपल्याला काय करायचं हे शिकवतात. मनापासून केलेल्या कामातच आपल्याला देव भेटतो आणि लोकांकडून आदर मिळून नावाला ‘राव’ जोडला जातो. कामातून आपली अशी एक ओळख निर्माण होते. शरदराव पवारसाहेब हे अशीच ओळख निर्माण झालेले नेते आहेत, असे प्रतिपादन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांनी केले.

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष पद्मभूषण, खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त नुकताच ‘कृतज्ञता सप्ताह’ संपन्न झाला. या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पेरे पाटील बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘रयत शिक्षण संस्थे’चे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे हे होते.कार्यक्रम प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन, पद्माकांत कुदळे, अरुण चंद्रे, मच्छिंद्र रोहमारे यांची विशेष उपस्थिती लाभली.

पेरे पाटील पुढे म्हणाले की, गावाचा विकास करणे ही किती साधी, सोपी गोष्ट आहे, हे दैनंदिन जीवन व अनुभवातील वेगवेगळी उदाहरणे देत आपल्या खुमासदार शैलीत प्रभावीपणे पटवून दिले. स्वच्छ पाणी, शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता व वृद्धांचा सांभाळ या पाच प्रश्नांची सोडवणूक म्हणजे गावाची, देशाची प्रगती, हे सूत्र उलगडून दाखवताना त्यांनी हसत खेळत,
उदाहरणे देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. देण्याने वाढतं म्हणून द्यायला शिका, दुसऱ्यांसाठी जगा, त्यांना समजून घ्या, राव व गाव सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही, असा संदेश देण्याबरोबरच त्यांनी जीवनात इतरांना सोबत घेऊन चालता येणे, हेच यशाचं गमक असल्याचे व याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून शरदचंद्र पवार यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचे सांगितले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अॅड. भगीरथ शिंदे म्हणाले, रयतचे अध्यक्ष पद्मभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. कर्मवीरांच्या पुरोगामी विचारांचा व
संस्कारांचा वारसा पुढच्या पिढीत रुजावा, तो चालविणाऱ्या अध्यक्ष शरद पवारांच्या योगदानाची जाणीव नव्या पिढीला व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी, महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिजीत बाविस्कर याचेही शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे भाषण झाले. तसेच या कृतज्ञता सप्ताहात घेतल्या गेलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, माता पालक मेळावा,
रांगोळी -चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नुकतेच यश मिळविलेल्या पूजा गवळी, अक्षय
पवार, तुषार गांगुर्डे या विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप, तीनही शाखेचे उपप्राचार्य, कनिष्ठमहाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. सुभाष रणधीर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा चव्हाण व प्रा.डॉ.वैशाली सुपेकर यांनी केले.