शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : ग्रामपंचायत राजची पहिली पायरी असून तालुक्यात पार पडलेल्या सत्तावीस ग्रामपंचायतीच्या निकालात राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळविले आहे. आता निवडणुका संपल्या असल्याने विजयी झालेल्या विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांनी आपणास कोणी मत दिले अथवा कोणी विरोध केला. हे विसरून सर्वांना बरोबर घेऊन जनकल्यानकारी योजनाचा लाभ गावातील गरीब माणसापर्यत पोहचून आपले गाव आदर्श करावे असे आवाहन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील घुले मित्रमंडळाच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने येथील बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित दिवाळी फराळ आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा सन्मान सोहळा माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
डॉ. घुले पुढे म्हणाले, विधान सभेत तालुक्याचा हक्काचा लोक प्रतिनिधी नसल्याने तालुक्याच्या विकासासह जनतेच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांची वाताहत झाली. पिण्याचे पाणी, शेतीसाठी बारमाही पाणी, औद्योगिक वसाहत, जायकवाडी कॅनॉल समांतर कालवा, ताजनापूर योजना टप्पा क्रमांक २, मुळाचे आवर्तन, अद्ययावत बसस्थानक, रस्ते, अशी विविध विकास कामे रखडली आहेत.
दुष्काळाचे फायदे फक्त लोक प्रतिनिधींच्या गावातच दिले जात आहेत. एकंदरीत तालुक्याचा सर्वांगीन विकास ओरबडून नेण्याचे काम होत आहे. हे निराशाजनक चित्र असल्याने या आपत्तीचे इष्टापतीमध्ये रुपांतर करण्याचे काम जनतेला करावे लागणार आहे. आपला माणूस विधान सभेत नसल्याने गेल्या दहा वर्षात आपली मोठी आधोगती झाली. ती रोखण्यासाठी वेळीच जागृत व्हावे लागेल. असे आवाहन केले.
पाणी पळवा पळवीची खत : जायकवाडी निर्मितीच्या वेळी मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावाना बारमाही पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तरीही कोपरे धरण रद्द केले आणि आता जायकवाडीचे वाटर अकाउंट शिल्लक नसताना निळवंडेची निर्मिती करण्यात आली. त्यातील पाणी जायकवाडीसाठी अपेक्षित असताना तेही कोणी पाटाद्वारे शिर्डी राहत्याला वाटेल त्या दिशेने ओढत आहेत. तर कोणी उजवा कालवा हाय लेव्हल करून परत मागे नेण्यासाठी झटत आहे. यामुळे जायकवाडीचे भवितव्य धोक्यात येणार आहे.
माजी सभापती डॉ. क्षितज घुले म्हणाले, घुले परिवाराने तालुका कुटूंब मानून सता असो वा नसो जनतेच्या अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांच्या मागे शक्ती उभी करण्याचे काम केले आहे. दिपावली पाडवा हा महत्वाचा सण नवीन संकल्प करण्याचा असल्याने प्रसंगी संघर्षाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून त्यासाठी एकोपा महत्वाचा आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, माजी सभापती रामनाथ राजपुरे, बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नखडे यांचेसह अनेकांनी आगामी विधान सभे बाबत पक्ष श्रेष्ठीचा निर्णय होईल तेव्हा व्होवो मात्र, घुले यांनी निवडणूक लढवावी ही तमाम कार्यकर्त्याची इच्छा असल्याने निर्णय घ्या व निवडणूक लढवा. कार्यक्रमासाठी झालेली प्रचंड गर्दी हेच सुचविते अशी भावनिक साथ घालत आग्रही मागणी केली.
यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप लांडे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, माजी सभापती अरुण लांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नमाणे, शिवाजी भुसारी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन भुसारी, पं. स. चेमाजी उपसभापती अंबादास कळमकर, ताहेर पटेल यांचेसह बाजार समितीचे सर्व संचालक, सचिव अविनाश म्हस्के, विविध गावचे सरपंच, सदस्य, सेवा संस्थेचे अध्यक्ष, भुसार त्यापारी, हमाल मापाडी संघाचे प्रतिनिधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.