कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : सण उत्सवाला देखील सुट्टी घेऊन आपल्या घरी न जाता सीमा आणि देश अहोरात्र सुरक्षित ठेवण्याचे काम सैनिक करतात. दिवाळी हा सर्वात मोठा सण आपण त्यांच्यासोबत साजरा करावा, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी सी.आय.एस.एफ शिर्डी येथे कार्यरत असणाऱ्या सैनिका समवेत आनंदोत्सवात साजरा केला. देशभक्तीपर गाण्यांवर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई, भेटवस्तू वाटप करून दिवाळी स्मरणीय ठरली.
यावेळी बोलताना सी.आय.एस.एफ शिर्डी येथील डेप्टी कमांडट आमिष कुमार म्हणाले की १९६९ मध्ये स्थापन झालेल्या सी.आय.एस.एफ च्या माध्यमातून अवकाश, विमानतळे, जलमार्गे, दिल्लीच्या भूगर्भातील मेट्रोची देखील सुरक्षा केली जाते. आम्हाला संकटांची सवय झाली त्यामुळे हे काम आम्ही आनंदाने स्वीकार करतो. देशभक्ती हा एक विचार आहे. पूर आणि दुष्काळात सेवा करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान हे देखील एक सैनिकच आहेत.
विवेक कोल्हे व त्यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक यांनी आमच्या समवेत दिवाळी साजरी करून आम्हाला अनोखा आनंद दिला. जसे आमचे घर तसेच हे प्रतिष्ठानचे युवक आमच्यासाठी एक प्रकारचे कुटुंबच आहेत वाटले. कुठेही दुष्काळ असो किंवा पूर, रक्षाबंधन, वृक्षारोपण यासह शेकडो उपक्रम घेणारे युवा सेवक हे देखील वर्दी नसताना सैनिकांचेच काम करत आहेत. आमच्या सेवेतील सर्वोत्तम दिवाळी वाटली अशी भावना कुमार यांनी व्यक्त केली.
या आनंदोत्सवा दरम्यान शुर जवानांनी आणि विवेक कोल्हे यांनी देशभक्तीच्या गाण्यावर नृत्य केले, एकमेकांना मिठाई भरवत फटाक्यांची आतिषबाजी केली त्यात असंख्य युवासेवक जल्लोष करताना वातावरण आनंदमय झाले होते.
युवानेते विवेक कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की घर परिवार एकटा सोडून देश सुरक्षित ठेवण्यासाठी झटणारे सैनिक खरे हिरो आहेत. कितीही कठीण परिस्थितीत सेवा देण्याचे काम ते करतात. संजीवनी युवा प्रतिष्ठान या अराजकीय संघटनेचा वैचारिक मूल्य युवकांना सैनिक, देशप्रेम, शेतकरी, दुःखीत पीडित नागरिक याबद्दल जाणीव आणि कणव निर्माण करून देणे हा आहे. ही दिवाळी सैनिकांच्या सोबत साजरी केल्याने मनस्वी आनंद मिळाला आहे.
पुढच्या पिढीला सुरक्षित भविष्य ज्यांच्यामुळे मिळते आहे. त्या सैनिकांचे ऋण विसरता येणार नाही. शेजारील देश एकीकडे हतबल असताना आपण सर्वोच्च स्थानी जातो आहोत. एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालेले दोन देश भारत आणि पाकिस्तान मात्र, प्रगतीत विभिन्नता आहे. देश भक्कम होतो आहे कारण राष्ट्रीयत्व जोपासून आपण पुढे जाणारे सजग नागरिक घडवण्याचा संकल्प पूर्ण करतो आहोत.
या वेळी इन्स्पेक्टर चंदन कुमार, इन्स्पेक्टर योगेंद्र प्रतापसिंग, इन्स्पेक्टर प्रदीप कुमार, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे, भाऊसाहेब निंबाळकर, विजय वाघ, तिवारी मेजर आदींसह सैनिक बंधू भगिनी, यूवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.