बस वेळेवर न सोडल्यास १३ जानेवारीला आंदोलनाचा ईशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ : शेवगाव बस स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या बस गाड्या वेळेवर सोडण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थीनी समवेत आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन दिले. बसगाड्या वेळेवर न सोडल्यास दि.१३ रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस कधीच वेळेवर सुटत नाहीत. विशेषतः गदेवाडी व मुंगीसाठी सायंकाळी सोडण्यात येणार्‍या बसेसचे वेळापत्रक फारच कोलमडले आहे. गेल्या काही दिवसात तर या बस गाड्या रात्री सात, आठ वाजता सोडल्या जात असल्याने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मोठे हाल होतात. रात्रीच्या वेळी बस स्थानकाच्या आवारात तळीरामांचा सुळसुळाट असतो अशा वेळी कोणतीही अपरित घटना घडु शकते.

बसस्थानकात पोलीसही नसतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांचे पालक कायम भितीच्या छायेत असतात. म्हणून या बसगाड्या वेळच्या वेळी सोडण्यात याव्यात. जर निवेदनाची योग्य दखल न घेतल्यास शनिवारी दि.१३ रोजी आघाडीचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील एसटी बसने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक हे वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली शेवगाव एस टी डेपो कार्यालया समोर बोंबाबोंब आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, जिल्हा संघटक रविन्द्र निळ, आकाश शिंदे, महेंद्र निळ, आनंद निळ, निरज शिंदे, आदित्य बल्लाळ, आमोल घुगरे, सनी कसबे आदिच्या सह्या आहेत. या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षकांना देण्यात आली आहे.