टॉस अथलेटिक्स २०२४ मध्ये प्राध्यापकांचे विशेष नैपुण्य

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील डॉ.सुनील कुटे व डॉ.वसुदेव साळुंके या दोन प्राध्यापकांनी विद्याविहार मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘टॉस अथलेटिक्स २०२४’ मध्ये विशेष नैपुण्य मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. एस. यादव यांनी दिली आहे.

सोमैया ग्रुप विद्याविहार च्या वतीने दरवर्षी टॉस अथलेटिक्सचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी झालेल्या या स्पर्धत दोनही प्राध्यापकांनी आठ स्पर्धमध्ये आठ पदके प्राप्त केली असुन यामध्ये सहा सुवर्णपदक व दोन रजत पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये डॉ. सुनील कुटे यांनी उत्तम कामगिरी करत १०० व २००मिटर धावणे, लांब उडी व इतर प्रकारात सुवर्ण पदक  मिळवले.

त्यांनी धावण्याचा व लांब उडीचे मागील सर्व विक्रम मोडीत काढत विक्रम स्थापित केला. त्यांच्या योगदाना बद्दल त्यांना टॉस अथलेटिक्स २०२४ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू गौरवाने सन्मानित करण्यात आले. तर डॉ.वसुदेव साळुंके यांनी ४०० मीटर धावणे व रिले प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले.

तसेच २०० मीटर व गोळाफेक या क्रीडा प्रकारात रजत पदक मिळवले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मिळविलेल्या या नैपुण्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, सचिव मा. ॲड.संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले.