शेवगावमध्ये ५८ ब्रास वाळूचा साठा जप्त

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०८ : तालुक्यातील सामनगाव शिवारात सारपे वस्ती जवळ विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदा केलेला ५८ ब्रास वाळूचा साठा व विना नंबरचे ३ डंपर, ३ ट्रॅक्टर ट्रॉली, दोन मोटरसायकली एक स्कार्पिओ गाडी, एक जेसीबी, असा एकूण ६७ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शेवगाव पोलिस पथकाने धडक कारवाई करत जप्त करुन पाच जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वेळी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून इतर तिघे फरार झाले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व परीक्षाविधीन आय.पी.एस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलीस पथक तयार करून सोमवारी पहाटेच्या सुमारास सामानगावच्या शिवारात सारपे वस्ती परिसरात छापा टाकून ही कारवाई केली.

याबाबत लाला तमीज शेख (वय ३८) व ऋषिकेश अर्जुन आहेर दोघे राहणार, भातकुडगाव अशा दोघा संशयतांना ताब्यात घेण्यात आले. तर गोकुळ आठरे, सचिन विठ्ठल टोंगे राहणार भातकुडगाव व नागेश बडधे राहणार जोहरापूर हे फरार झाले आहेत.

या प्रसंगी पोलीस पथक शासकीय काम करत असताना यातील संशयित आरोपी लाला तमीज शेख राहणार भातकुडगाव याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ गाडी क्रमांक एम.एच. १२ एन.जी २७९२ पोलीस पथकाच्या अंगावर घालून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने व तेथून त्यांना पळून जाता यावे, या उद्देशाने अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बाजूला होऊन जीव वाचविला. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत वरील पाचही संशयित आरोपीवर शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभाकर गलधर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वी कलम ३०७, ३५३, ३७९, ३४ पर्यावरण संरक्षण अधिनियम १५, ३ खाण व खनिज अधिनियम २१, (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.