काळे महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सुरेखा बिडगरची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदावर नियुक्ती होणे हि महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय भूषणावह बाब असून, सुशीलामाई काळे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांनी केले आहे.

सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुरेखा (शेळके) बिडगर यांनी एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होवून मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून, पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा चैताली काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होवून त्यांना मोठ्या पदावर नोकरी मिळावी. मुलांप्रमाणे मुली देखील स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात, यासाठी सुशीलामाई काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे यांना कोळपेवाडी येथे महाविद्यालय सुरु करण्यास भाग पाडले.

महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर नोकरीस आहेत. परंतु त्याचबरोबर अनेक माजी विद्यार्थिनी देखील मोठ्या पदावर कार्यरत असून, न्यायाधीश म्हणून देखील काम करीत आहेत. आजपर्यंत व यापुढील काळात देखील शहरातील शाळा, महाविद्यालयात मिळणाऱ्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. यासाठी काळे परिवार नेहमी संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 

त्यामुळे सुरेखा (शेळके) बिडगर यांचा आदर्श घेवून सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यश संपादन करून स्वत:चे व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे आवाहन चैतालीताई काळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व सध्या कार्यरत असलेले प्रा. सागर मोरे हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व शासनाच्या कौशल्य राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतुजा आभाळे हिने महाविद्यालया मार्फत सुरु करण्यात आलेल्या, टॅली कोर्समध्ये महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला व तिचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय करून देतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी महाविद्यालय हे विद्यार्थी केंद्रीत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच अभिनव उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमाकांत कदम व प्रा. सागर मोरे यांनी केले. तर आभार कला शाखाप्रमुख प्रा. सुनीता शिंदे यांनी मानले.

भौतिक सुविधांची रेलचेल म्हणजेच गुणवत्तापूर्ण शाळा असा गोड गैरसमज अलिकडे पालकांचा आणि समाजाचा झाला आहे. कधीकाळी झाडाखाली बसून शाळा भरायच्या तरी शिक्षणाचा प्रवास घडायचा व त्यातूनही अनेकाचे आयुष्य उज्जवलतेने सजलेले आहे. त्यामुळे कर्मवीर आण्णांच्या झाडाखाली भरणाऱ्या शाळा देखील गुणवत्तापूर्ण होत्या. गुणवत्तेचा तोच वसा घेवून कर्मवीर शंकरराव काळे रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात अजोड कामगिरी बजावण्या बरोबरच हे महाविद्यालय सुरु केल्यामुळे, मला देखील उच्च शिक्षण घेता आले व मी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचू शकले. यामागे माझे वेळेचे काटेकोर नियोजन, अथक परिश्रम, कुटुंबाची साथ नक्की आहे. परंतु या महाविद्यालयातील शिक्षकांनी मला मुलीप्रमाणे सांभाळलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्यामध्ये मी नेहमी माझ्या आईवडिलांना पाहिले, म्हणून मी यशस्वी होवू शकले. शिक्षणाचा आत्मा भौतिक सुविधा नाही तर ज्ञानाची निर्मिती आहे. त्यामुळे भौतिक सुविधा म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही. – सुरेखा (शेळके) बिडगर