शेवगावमध्ये तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदील

शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ : शेवगाव तालुक्यात गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. पाऊस नसल्याने खरीप पिके माना टाकू लागली आहे. शेतकऱ्यांनी उधार उसनवार करून पेरण्या केल्या. अनेकांनी रासायनिक खते घेऊन ठेवलीत. मात्र पाऊसच गायब असल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली. 

त्यातच कपासीवर काळा मावा तसेच तूर व सोयाबीनवर तुडतुडे व खोड किड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अनेक भागात दुबार पेरणीची भिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या सावटामुळे शेतकर्‍यांचे आर्थकारण कोलमडून पडले आहे.

तालुक्याचे खरिपाचे सरासरी ८७ हजार ९७९ हेक्टर क्षेत्र असून, यंदाच्या हंगामात उद्दीष्ट क्षेत्राच्या सुमारे १२० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ४६ हजार ६७१ हेक्टर कपासी, तूर ९ हजार २३६ हेक्टर, बाजरी एक हजार ७५९ हेक्टर, सोयाबीन १ हजार ४२७ हेक्टर, मुग ३८६ हेक्टर, भुईमूग २६८ हेक्टर, कांदा २६० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. याशिवाय ऊसाचे क्षेत्र १६ हजार ६०७ हेक्टर आहे. 

जून महिन्यात या परिसरात अत्यंत कमी पाऊस पडला. मात्र येथे प्रत्येक वर्षी उशीरा पाऊस सुरु होत असल्यामुळे, पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकल्या. मध्यतरी किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. तो समाधानकारक नव्हता. अनेक भागात पावसाळा सुरु झाल्यापासून, जोरदार पाऊसच नसल्याने, सध्या कापसासह विविध पिकाची वाढ खुंटली आहे.

सध्या कपाशीवर काळा मावा तसेच तूर व सोयाबीनवर तुडतुडे व खोडकीडीचा प्रादुर्भाव वाढल्याने, तो रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतर प्रवाही कीटक नाशकांचा वापर करावा. त्यात दहा लिटर पाण्यात ३० एम.एल डायमेथोएट, तसेच ४ ते ५ एम.एल इमिडाक्लोप्रिड १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. कीटक नाशके फवारताना शेतकर्यांनी मास्क, हातमोजे व चष्मा लावण्याची काळजी घ्यावी. असा सल्ला पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहूल कदम यांनी दिला आहे.

पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे करून हेक्टरी अनुदान जाहीर करून, दिलासा देण्याची मागणी करणारे निवेदन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री, कृषी आयुक्त, जिल्हा संपर्क मंत्री यांचेसह सर्व संबंधितांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, तालुका अध्यक्ष मेजर अशोक भोसले यांनी दिली.