गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गौतम सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर वामनराव दंडवते यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६८ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी शोक व्यक्त केला आहे.

  कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी असलेले व कारवाडी ग्रामपंचायतचे प्रथम माजी सरपंच सुधाकर दंडवते हे काळे गटाचे विश्वासू सहकारी होते. कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांच्या समवेत सामाजिक, राजकीय कामात त्यांचा सक्रीय सहभाग राहत असे. त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक,जिल्हा परिषदेचे दोन वेळा सदस्य तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे. गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष व गायत्री नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशा विविध पदांवर काम करतांना त्यांनी या पदांना आपल्या कामातून न्याय दिला आहे.

द्राक्ष शेतीची त्यांना आवड असल्यामुळे उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांची कारवाडी व परिसरात ओळख होती. ते महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागीय संचालक असल्यामुळे सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या मिटींगसाठी ते सोलापूर येथे गेले असता शनिवार रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, भावजय, पाच भगिनी, पत्नी, दोन मुले आहेत. मोठा मुलगा राहुल शेती करतो तर दुसरा मुलगा सागर अमेरिकेत अभियंता म्हणून वास्तव्यास असून दोन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे.

अतिशय मनमोकळा स्वभाव व सर्वांशी त्यांचे आपुलकीचे नाते होते. त्यांच्या निधनामुळे कारवाडी व पंचक्रोशीतील गावांमध्ये शोककळा पसरली आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांपासून काळे परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या सुधाकर दंडवते यांच्या अकाली निधनामुळे काळे परिवाराने विश्वासू सहकारी गमावला असल्याचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले आहे.