पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पास गती द्या – कोल्हे  

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : एके काळी सुजलाम् सुफलाम् असलेल्या गोदावरी खोऱ्यात आता पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली असून, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यास भासणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पास राज्य सरकारने गती द्यावी, अशी आग्रही मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Mypage

स्नेहलताताई कोल्हे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले आहे. निवेदनात स्नेहलताताई कोल्हे यांनी म्हटले आहे की, उर्ध्व गोदावरी खोरे हे पाण्याच्या उपलब्धतेबाबत अतितुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या तुटीच्या खोऱ्यात पाणी उपलब्ध होऊन पाण्याची समृध्दी व्हावी आणि महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांनी पश्चिमेचे अरबी समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला आणि याबाबत सन २००० मध्ये विधिमंडळात मंजुरी घेतलेली आहे.

Mypage

यासंदर्भात माझ्या विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात पाठपुरावा केलेला आहे. कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत पाणी अडविण्यासाठी ज्याप्रमाणे शासनाने प्रथम प्राधान्य देऊन कृती आराखडा तयार करून कामे मार्गी लावली होती, त्याच धर्तीवर पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्याच्या कामास प्राधान्य देण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी कृती आराखडा तयार करून धडक कार्यक्रम हाती घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी व्हावी व त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. 

Mypage

या प्रकल्पाची तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतराव कराड यांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबादचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या दालनात आढावा बैठक घेऊन त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही केलेल्या आहेत. गोदावरी खोरे हे अतितुटीचे असून, त्याबाबत दुसऱ्या जलसिंचन आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष, जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी पश्चिमेकडील नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवले तर नगर, नाशिक जिल्ह्यातील व मराठवाड्यात सतत भेडसावणारा पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, अशी शिफारस महाराष्ट्र शासनास केलेली आहे. त्या अनुषंगाने सह्याद्रीच्या माथ्यावर प्रस्तावित ३० वळण बंधाऱ्यांपैकी ज्या बंधाऱ्यांचे काम अपूर्ण आहे ते तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्याद्वारे अंदाजे ७.५० टी. एम. सी. पाणी उपलब्ध होऊ शकते व काही अंशी पाण्याची तूट कमी होऊ शकते.

Mypage

तसेच वैतरणा सँडल गेट, नारपार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी व दमगणगंगा-पिंजाळ या प्रस्तावित प्रकल्पांची कार्यवाही झाल्यास अंदाजे २५ टी. एम. सी. पाणी उपलब्ध होऊ शकते. त्याद्वारे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील फळबागा, दीर्घकालीन शेती योजना, औद्योगिक प्रकल्प, तसेच पिण्याचे पाणी यांचे सुयोग्य नियोजन होऊ शकते. तसेच मराठवाडा विभागातील शेती सिंचन, औद्योगिक क्षेत्र व पिण्यासाठी लागणारे पाणी यांचेही सुयोग्य नियोजन होऊन शाश्वत पाणीपुरवठा होऊ शकतो. कमी व बेभरवशाचे पर्जन्यमान, वाढते नागरीकरण व औद्योगिकरण व इतर कारणांमुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात नेहमीच पाण्याची समस्या भेडसावत असून, पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.

Mypage

पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे मोठ्या प्रमाणात अरबी समुद्राला पाणी वाहून जाते. हे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविल्यास अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा विभागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे अहमदनगर, नाशिक या दोन जिल्ह्यांसह मराठवाड्याला जाणवणाऱ्या पाणी तुटवड्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प लवकर पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित विभागास त्वरित उचित कार्यवाही होण्यासाठी आदेश व्हावा, अशीही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी निवेदनात शेवटी केली आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *