मातृभाषेतून शिक्षण घेणे महत्वाचे – धारूरकर

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०१ : प्राचीन भारताच्या शिक्षण परंपरेचा आधुनिक शिक्षण व्यवस्थेत वापर केल्यास, आपली शैक्षणिक व्यवस्था जगात सर्वात यशस्वी ठरेल. असे मत त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही.एल. धारूरकर यांनी व्यक्त केले. येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची अंमलबजावणी या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्य शाळेत ते मार्गदर्शन करत होते.

धारूरकर म्हणाले, ज्ञानाचे क्षितीज उंचवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षण ही संकल्पना आली आहे. ती योग्य व गरजेची आहे. कारण मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर आपल्या संकल्पना स्पष्ट समजतात व आपल्या कल्पना शक्तीलाही वाव मिळतो. थोडक्यात अंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, ऐच्छिक विषय, ऑटोनॉमस व प्रादेशिक भाषेत शिक्षण घेण्यासाठी भाषा हा अडसर राहणार नाही.

या नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वात मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्याला स्वतःचे समर्थ्य ओळखता आले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सामर्थ्यशाली असले पाहिजे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे होते. यावेळी विजय जोग महाविद्यालयातील  प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. रवींद्र वैद्य यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके यांनी आभार मानले.