विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात शिक्षक व पालकांचा मोलाचा वाटा – विवेक कोल्हे 

शिंगणापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : शिक्षक आणि पालक हे दोघेही विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे मोलाचे काम करत असतात. पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप परिश्रम घेत असतात, तर शिक्षक विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करत त्यांना चांगले नागरिक बनविण्याचे काम करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या कायम ऋणात राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिंगणापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी गुणवान असून, या विद्यार्थ्यामधून भविष्यात एखादा उत्कृष्ट गायक, चित्रकार, कलाकार, व्याख्याता निर्माण होईल आणि त्यांचे उदाहरण आम्ही इतर तालुक्यातील विद्यार्थांना देऊ, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

कोल्हे म्हणाले, एखादा मूर्तिकार खूप मेहनत घेऊन सुंदर व आकर्षक मूर्ती तयार करतो. कुंभार मातीला आकार देऊन सुंदर वस्तू तयार करतो. जेव्हा माती ओली असते तेव्हा तिला आकार देता येतो. देशाची भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. विद्यार्थी घडविण्याचे काम विद्यार्थीदशेत्तच होते. वयाच्या २०-२२ वर्षांपर्यंत ते शिक्षण घेत असतात. कुंभार ज्याप्रमाणे आपल्या दोन हातांनी एखादी वस्तू घडवतो त्याप्रमाणे विद्यार्थी दोन हातांनी आकृती तयार करत असतात.

त्यापैकी एक हात म्हणजे शिक्षक तर दुसरा हात म्हणजे त्यांच्या पालकांचा असतो. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक आणि पालक हे दोघेही करत असतात. पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, प्रगतीसाठी खूप परिश्रम घेत असतात, तर शिक्षक विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करत त्यांना चांगले नागरिक म्हणून घडविण्याचे काम करत असतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक व पालक यांचे मोलाचे स्थान असते. त्यामुळे या दोघांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.

शिंगणापूर ही माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेंची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. स्व. कोल्हेंनी केवळ शिंगणापूर परिसरातच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणली आहे. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थांना त्यांचे कलागुण दाखविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. शिंगणापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुढील काळात आदर्श असे स्नेहसंमेलन आयोजित करावे. त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही विवेक कोल्हे यांनी दिली. 

याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, मुख्याध्यापक भवर, शाळा समितीचे अध्यक्ष अरविंद संवत्सरकर, उपाध्यक्ष नीता आढाव, सरपंच डॉ. विजय काळे, उपसरपंच रत्ना संवत्सरकर, राजेंद्र संवत्सरकर, यादव संवत्सरकर, बाळासाहेब संवत्सरकर, संजय तुळसकर, अंकुश कुऱ्हे, दत्तू संवत्सरकर, पोलिस पाटील सविता आढाव, भाऊलाल कुऱ्हे, श्याम संवत्सरकर, काशिनाथ आढाव, प्रसाद आढाव, जालिंदर संवत्सरकर, जयराम संवत्सरकर, शरद संवत्सरकर, अशोक वराट, प्रमोद संवत्सरकर, गणेश राऊत, दिनकर मोरे, विश्वास जानराव, भाऊसाहेब वाघ, पंकज कुऱ्हे, शेखर कुऱ्हे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.