शेवगाव पोलिसांनी रस्त्याचा कोंडलेला श्वास मोकळा केला

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेवगावातील रहदारीच्या विविध चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी   रस्त्यावरील हातगाड्या, बेशिस्त पद्धतीने पार्किंग केलेली वाहने, उभारण्यात आलेले होल्डिंग फलक हटवून शेवगाव पोलिसांनी रस्त्याचा कोंडलेला श्वास मोकळा केला. त्यामुळे वाहन धारकांसह रस्त्याने पायी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र हा दिलासा तापुरता न ठरता तो कायम टिकावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

शेवगाव शहरातून पाथर्डी, नेवासे, पैठण, मिरी मार्गे नगर, गेवराई आदी रस्त्यावरील विविध चौकात गेल्या काही दिवसापासून दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावरील छोटे व्यावसायिक, दुकानदार, वाहन चालक व नागरिक त्रस्त झाले होते. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असल्याने उस  वाहतुक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर जुगाड, बैलगाड्या, तसेच अंबड, जालना, शेंद्रे औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या अवजड साहित्यांची वाहने या चौकातून  रात्रंदिवस होत असते, यामुळे येथे अनेक अपघात होत असतात. याबद्दल नागरीकातून तक्रारी आहेत.

       शहरातील क्रांती चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यावरील हातगाड्या तसेच होल्डिंग फलकांमुळे हा परिसर वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरला आहे. शहरातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय ठरणाराबाह्य वळणरस्त्यां  बाबतही संबधित विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने जनतेची वाढती नाराजी आहे.

       या सर्व पार्श्वभूमीवर शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडीस  कारणीभूत ठरणारी वाहने, हातगाड्या, व होल्डिंग फलकावर पोलीस पथकाने कारवाई केली. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या शेवगावकर नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कायम गजबजलेले प्रमुख रस्ते सध्या बऱ्यापैकी मोकळे झाले. पोलीस निरीक्षक पुजारी यांच्यासह वाहतूक शाखेचे राजेंद्र ढाकणे, रवींद्र शेळके, अशोक लीपणे, राजेंद्र नागरगोजे, राहुल खेडकर आदी वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

पोलीस विभागाने  सुरु केलेली ही मोहीम सातत्याने सुरु रहावी तसेच या मोहिमेत पोलीस विभागासह नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील सहभागी होवून नियम धाब्यावर बसविणारा मग तो कोणीही असो त्याच्यावर दंडात्मक कारवाई  करून  ही मोहीम औटघटकेची ठरणार नाही याची काळजी घ्यावी. ही मोहीम अधिक धडकपणाने राबवून शेवगावकर नागरिकांना दिलासा मिळेल या पद्धतीने कारवाईत सातत्य राखण्याची गरज आहे.