धान्य गोदामासाठी ५.२८ कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगाव शहरातील ब्रिटीशकालीन धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यामुळे नवीन धान्य गोदाम बांधणे अत्यंत गरजेचे होते. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे प्रस्ताव दाखल करून निधीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने कोपरगाव येथे नवीन तीन हजार मे. टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदाम बांधण्यासाठी ५.२८ कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात आणखी एका शासकीय इमारतीची भर पडणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील जनतेला रेशनवर धान्य पुरवठा करणाऱ्या धान्य गोदामची अत्यंत दुरावस्था झाली होती त्यामुळे धान्याचे नुकसान व येणाऱ्या वितरण व्यवस्थेत अडचणी येत होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीशकालीन व्यवस्थेत त्यावेळी सद्य लोकसंख्येनुसार उभारण्यात आलेल्या या धान्य गोदामाची साठवण क्षमता कमी असल्यामुळे नवीन शासकीय धान्य गोदाम बांधणे गरजेचे होते.

आज रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील वाढलेल्या लोकसंख्येला वेळेत रेशनचा पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव शहरात शासनाच्या मालकीचे स्वत:चे मोठी क्षमता असलेले शासकीय गोदाम व्हावे यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नवीन तीन हजार मे.टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदामासाठी महायुती शासानाने ५.२८ कोटी निधी मंजूर केला आहे.

या गोदामाच्या सभोवताली सर्व प्रकारच्या सोयी सुविधा व वाहन धारकांसाठी पार्किंगची प्रशस्त सुविधा उपलब्ध असणार आहे. या पाच वर्षात कोपरगाव शहरात जवळपास ९० कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय इमारतींमध्ये उपजिल्हा रुग्णालय,  न्यायालय  इमारत, ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यालय व कर्मचारी वसाहत, पंचायत समिती इमारत, पशु-चिकित्सालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत, व्यापार संकुल, नगरपरिषद इमारत अशा विविध शासकीय इमारतींनी कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली असून धान्य गोदामाच्या इमारतीमुळे त्यात अधिकची भर पडणार आहे. त्याबद्दल मतदार संघातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे.