कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ एप्रिल २०२६ : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी काळे गटाचे नगरसेवक अनुपस्थित राहून त्यांनी शहराच्या विकासात्मक निर्णयाला त्यांचा विरोध असल्याचेच स्पष्ट केले आहे. स्वतःच्या कार्यकर्त्याने स्वामी समर्थ केंद्र प्रमुखाला अरेरावी करून धार्मिक ठिकाणी केलेल्या वादाला उलटा चोर कोतवाल को दाटे अशी भूमिका घेत खरा चेहरा काळे गटाचा उघडा पडला आहे. अशी टीका उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केली आहे.

जर एखाद्या कार्यकर्त्याच्या वैयक्तिक भूमिकेमुळे संपूर्ण शहर विकासाचे प्रश्नाचे ठराव संमत होत असताना काळे गटाचे नगरसेवकांनी अप्रत्यक्ष विरोध दर्शविला आहे. शहराची शांतता भंग करण्याचे काम कोण करते हे शहराला ठाऊक आहे त्यामुळे कायदेशीर कारवाई देखील कुणावर झालेल्या आहेत हे पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप करणाऱ्यांनी एकदा अंतर्मुख होऊन बघावे.

गेले चार वर्षातील अनेक कामात अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे जाणवते आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार देखील झाला आहे त्याची चौकशी होण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आले आहे. यामुळे श्वेतपत्रिका काढून हा गैरव्यवहार बाहेर येईल म्हणून भीतीपोटी कुणाच्या आदेशावरून नगरसेवक उपस्थित राहिले नाही हे सांगण्याची गरज नाही. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आमचा पारदर्शक कारभार असल्याने आम्ही श्वेतपत्रिका काढण्याचा विषय मांडणार आहोत हे जाणीव झाल्याने विरोधी नगरसेवकांनी अनुपस्थिती दाखवली आहे.

ठेकेदाराने आणलेल्या नारळावर देखील स्वतःचे नाव कोरण्याचा प्रयत्न करून बालिश वक्तव्य करणाऱ्यांना जनतेने कायमचा राजकीय नारळ दिला आहे त्यामुळे त्यांची अवस्था हास्यपद झाली आहे.


