शहिदांचे स्मरण हीच ज्वलंत राष्ट्रभावना – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६: शहिदांचे स्मरण हीच ज्वलंत राष्ट्रभावना आहे. देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या लष्करातील शूर जवानांना आणि जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलिसांना कधीही विसरू नका. त्यांच्यामुळेच आज आपला देश व आपण सर्वजण सुरक्षित आहोत, याची जाणीव ठेवून वीर जवान व पोलिस बांधवांच्या कार्याची सदैव आठवण ठेवा, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय लष्करातील सुरक्षा जवान, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना रविवारी (२६ नोव्हेंबर) कोपरगाव येथील माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांना व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

विवेक कोल्हे यावेळी म्हणाले, २६ नोव्हेंबर २००८ हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. १५ वर्षांपूर्वी याच दिवशी आपण सर्व देशवासीय भारतीय संविधान आणि लोकशाहीचा, नागरिकांच्या हक्कांचा उत्सव साजरा करत होतो, तेव्हा मुंबईवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन, दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्यासह अनेक वीर जवान व पोलिस कर्मचारी शहीद झाले.

या अतिरेकी हल्ल्यात १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ओल्या आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना देशासाठी लढताना ज्यांनी प्राण गमावले त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून त्यांच्या कार्याची आपण सर्वांनी नेहमी आठवण ठेवली पाहिजे. 

यावेळी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगरसेवक अशोक लकारे, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, रवींद्र रोहमारे, जगदीश मोरे, दादासाहेब नाईकवाडे, जयेश बडवे, बाबासाहेब साळुंके, खालिकभाई कुरेशी, प्रसाद आढाव, सचिन सावंत, शफिकभाई सय्यद, जयप्रकाश आव्हाड, सतीश रानोडे, शंकर बिऱ्हाडे, सतीश चव्हाण, संजय तुपसुंदर, अंकुश जोशी, राजेंद्र कवडे, विक्रांत सोनवणे, प्रभुदास पाखरे, विजय चव्हाणके, वसंतराव गायकवाड आदींसह भाजप, भाजयुमो, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.